राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजीमंत्री, माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काल काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा दिला. या घनटेमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली. यामुळे काँग्रेसमधील अतंर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचं बोललं जात आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातील राजकीय घडामोडींमुळे आपली अवहेलना झाल्याचा ठपका ठेवत बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा सादर केल्याचे दिसून येत आहे. बाळासाहेब थोरात यांनी घेतेलेल्या या तडकाफडकीच्या निर्णयावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना(ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया देताना बाळासाहेब थोरातांबद्दल विधान केलं आहे.
हेही वाचा – “…त्यामुळे ‘शिल्लकांनी’ नको तिथे बोटं खुपसू नयेत, नाहीतर…” मनसे आमदार प्रमोद पाटलांचा आदित्य ठाकरेंना इशारा!
प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “बाळासाहेब थोरातांनी भूमिका घेतलेली आहे. पण आम्ही जे काय बाळासाहेब थोरात आणि त्यांच्या कुटुंबाला ओळखतो, त्यांच्या नसानसात काँग्रेस आहे. असं आम्ही अनेक वर्षांपासून पाहतो. हा त्यांचा राज्यातला पक्षांतर्गत मुद्दा किंवा वाद आहे आणि आम्ही भाष्य यासाठीच करतो, कारण शेवटी काँग्रेस हा महाविकास आघाडीमधील एक घटक पक्ष आहे आणि त्यांच्या पक्षात सगळं स्थिरस्थावर असावं, ही आमची भूमिका आहे.”
हेही वाचा – भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर, म्हणाले…
याचबरोबर, “दिल्लीतील त्यांचं हायकमांड यामध्ये लक्ष घालेल याची आम्हाला खात्री आहे. कारण, त्यांच्या अंतर्गत वादावर आम्ही बोलणं योग्य नाही. पण बाळासाहेब थोरात हे या अगोदर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष असताना, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. अत्यंत संयमी, स्वच्छ चारित्र्याचे, कर्तबगार असे ते नेते आहेत. थोरातांसारख्या नेत्याने अशी बंडाची भूमिका घ्यावी, म्हणजे नक्कीच ते मनातून दुखावलेले दिसत आहेत, अस्वस्थ आहेत. म्हणून त्यांच्या भूमिका त्यांचा पक्ष जाणून घेईन, असंच मी सांगू शकतो या पलिकडे मी बोलू शकत नाही.” असंही संजय राऊतांनी यावेळी सांगितलं.