काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो यात्रे’दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानंतर राजकीय वातावरण तापलं होतं. मनसे, शिंदे गट आणि भाजपाचे नेत्यांनी राहुल गांधींविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यातच आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने राजकीय वातावरण अधिकच चिघळताना दिसत आहे. त्यांच्या या विधानाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी भाजपासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा दिला आहे.
“वीर सावरकरांच्या अपमानानंतर तुमची लोक मुंबई आणि महाराष्ट्रात रस्त्यांवर उतरून राहुल गांधींना जोडे मारत आहेत, आता ते जोडे कुठे गेले? कोणाला जोडे मारणार तुम्ही?” असा सवाल संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून केला आहे.
याचबरोबर “वीर सावरकर हे असे एकमेव महापुरुष होते, ज्यांनी त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांची आरती लिहिली. शिवाजी महाराज हे त्यांचे प्रेरणास्थान होते, गुरु होते आणि अशा शिवाजी महाराजांचा अपमान सुद्धा आपण सहन करता आहात, आपल्याला सावरकरांवर बोलण्याचा सुद्धा हक्क नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने इथे बोलण्याचा अधिकार नाही.” असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
हेही वाचा – “छत्रपतींनी जर माफी मागितली, तर मग पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात…”; संजय राऊतांचं विधान!
याशिवाय, “मुख्यमंत्र्यांनी सगळ्यात आधी भाजपाचा निषेध केला पाहिजे, धिक्कार केला पाहिजे आणि राज्यपालांना हटवण्याची मागणी महाराष्ट्र सरकारकडून अधिकृतपणे यायला पाहिजे. नाहीतर जोडे काय असतात आणि जोडे कसे मारले जातात हे शिवसेना दाखवल्याशिवाय राहणार नाही.” असा इशाराही संजय राऊतांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला.