Sanjay Savkare On Pune Shivshahi Bus Case : पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली. या घटनेनंतर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला २८ फेब्रुवारी रोजी पुणे पोलिसांनी अटक केलं असून न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या संदर्भाने बोलताना वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी एक असंवेदनशील वक्तव्य केलं होतं. त्यांच्या विधानानंतर विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. तसेच अनेकांनी त्यांच्या विधानाबाबत नाराजी व्यक्त केली होती. यानंतर मंत्री संजय सावकारे यांनी त्यांच्या विधानाबाबत माफी मागितली आहे. ‘माझ्या बोलण्याचा कोणताही तसा उद्देश नव्हता. माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला’, असं स्पष्टीकरण देखील सावकारे यांनी माध्यमांशी बोलताना दिलं.
मंत्री संजय सावकारे काय म्हणाले?
“बलात्कार घडतात असं मी काही बोललेलो नाही. सर्वात आधी जर कोणाचं मन दुखावलं असेल तर मी माफी मागतो. माझ्या बोलण्याचा कोणताही तसा उद्देश नव्हता. पत्रकारांनी मला विचारलं होतं की तुमचं सरकार आल्यापासून महाराष्ट्रात महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे मी ते बोललो. पण माझ्या त्या विधानाचा विपर्यास करण्यात आला. तरी माझ्या विधानामुळे कोणाची मने दुखावली गेली असतील तर मी माफी मागतो. माझा असा कोणताही उद्देश नव्हता. तसेच महाराष्ट्रातील सरकार अशा घटनांच्या बाबतीत अतिशय संवेदनशील आहे. अशा घटनांमध्ये तातडीने कारवाई केली जाते”, असं मंत्री संजय सावकारे यांनी म्हटलं आहे.
संजय सावकारे यांनी काय विधान केलं होतं?
दरम्यान, स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर अत्यावर झाल्याची घटना घडली. या घटनेबाबत माध्यमांनी मंत्री संजय सावकारे यांना काही प्रश्न विचारले होते. त्यावर बोलताना सावकारे यांनी म्हटलं होतं की, “एखादी घटना घडली म्हणून महिला सुरक्षित नाहीत असं म्हणता येणार नाही. देशात म्हटलं तर घटना घडत असतात. तसेच कारवाई देखील सुरू असते. तसेच महिला असो किंवा पुरुष असो सर्वजण सुरक्षित राहिले पाहिजेत”, असं मंत्री संजय सावकारे यांनी म्हटलं होतं.
योगेश कदम यांचीही सारवासारव
स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये झालेल्या घटनेबाबत बोलताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी म्हटलं होतं की, “स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये जी घटना घडली, ती घटना कुठलीही फोर्सफुली किंवा स्ट्रगल न झाल्यामुळे घडली. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी त्या ठिकाणी जवळ आसपास दहा ते पंधरा लोकं आजू बाजूला उपस्थित होते. पण कोणालाही शंका आली नाही”, असं योगेश कदम यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या विधानावर विरोधकांनी टीका केली. यानंतर त्यांनी सारवासारव केली. योगेश कदम म्हणाले की, “काल मी जे विधान केलं त्याचा विरोधकांकडून विपर्यास केला गेला. स्वारगेट आगारात मी जेव्हा काल भेट दिली, तेव्हा मला दिसलं की, ती रहदारीची जागा होती. रहदारीचा परिसर असून आमच्या भगिनीवर अत्याचार होत असताना कुणीच कसे मदतीसाठी आले नाही, हा प्रश्न मी पोलिसांना विचारला. त्यांनी मला जे उत्तर दिले, ते मी पत्रकार परिषदेत सांगितले. पण माझ्या विधानाचा विपर्यास करून त्याचा राजकारणासाठी वापर होत असेल तर हे दुर्दैवी आहे”, असं योगेश कदम यांनी म्हटलं.