अजित पवारांसह ९ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यामध्ये आदिती तटकरे यांचाही समावेश आहे. आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्रीपद मिळण्याची चर्चा आहे. पण, पालकमंत्रीपद आम्हालाच मिळणार, असा दावा शिवसेना ( शिंदे गट ) आमदार भरत गोगावले यांनी केला होता. यावरून आमदार संजय शिरसाट यांनी भरत गोगावले यांना सल्ला दिला आहे.
भरत गोगावले काय म्हणाले?
“आदिती तटकरे यांना पालमंत्रीपद मिळू नये, असं आम्ही बोललो नाही. गेल्यावेळीही आम्ही आदिती तटकरे यांना पालकमंत्री म्हणून स्वीकारलं आहे. पण, आता घडलेल्या घडामोडीनंतर पालकमंत्रीपद आम्हाला मिळावे, अशी मागणी जिल्ह्यातील शिवसैनिक आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. ती मागणी आम्ही पुढे लावून धरली आहे. म्हणून ते पालकमंत्रीपद उदय सामंत यांच्याकडे ठेवलं आहे. आता ते आम्हाला मिळावे, अशी इच्छा आहे,” असं विधान भरत गोगावले यांनी केलं होतं.
हेही वाचा : “शरद पवार नमस्कार करत फिरले, तरी…”, बाळासाहेब थोरात यांचं विधान
भरत गोगावले यांच्या विधानावर संजय शिरसाट म्हणाले की, “भरत गोगावले हे पक्षाचे प्रतोद आहेत. त्यांनी माध्यमांसमोर अशा गोष्टींची चर्चा करायची नसते. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अडचण निर्माण होते.”
हेही वाचा : “…तेव्हाच सिग्नल मिळाला होता”, अजित पवारांच्या बंडावर थोरातांचं मोठं विधान
“भरत गोगावले कधी-कधी भावनिक होऊन बोलतात. मात्र, त्याचा त्रास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना होतो. त्यामुळे भरत गोगावलेंना विंनती आहे, की माध्यमांसमोर जास्त बोलू नये. अशा बोलण्याने तुमच्या भावना एकनाथ शिंदे यांच्याकडे जातील, असा भाग नाही,” असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.