शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रवक्ते आणि आमदार संजय शिरसाट यांनी दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं होतं. आमदार संजय शिरसाटांच्या मते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची क्षमता मोठी असून त्यांनी केंद्रात नेतृत्व करावं. शिरसाटांच्या या वक्तव्यावरून शिवसेनेच्या ठाकरे गटाने देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. ठाकरे गटानं त्यांच्या पक्षाचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलं आहे की फडणवीसांची कपॅसिटी मोठी आहे आणि ती कपॅसिटी केवळ दिल्लीतच उपयुक्त असल्याचं शिंदे गटाने ठरवले आहे, पण या कपॅसिटीचा शोध मोदी-शहांना का लागू नये? कपॅसिटी असताना फडणवीसांना मुख्यमंत्रीपदावरून खाली आणले आणि कपॅसिटी नसलेल्यांच्या हाताखाली हरकाम्या करून त्यांची ‘लायकी’ काढली हे बरे नाही.

याच प्रकरणावर बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले, कोणीतरी ऐरागैरा उठतो आणि देवेंद्र फडणवीसांची लायकी काढतो. त्यावर आता संजय शिरसाट यांनी उत्तर दिलं आहे. आमदार संजय शिरसाट म्हणाले, मी ऐरागैरा असेन, पण दलाल नाही.

शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट म्हणाले, हे (ठाकरे गट) पतंप्रधान नरेंद्र मोदींच्या पाया पडणारे लोक आज मोदींबद्दल बोलत आहेत. मोदींच्या नखाचीसुद्धा लायकी नसणारे लोक आज या भाषेत बोलतात. त्यावरून खऱ्या अर्थाने यांची लायकी कळते. मोदी कुठे आणि यांची लायकी कुठे? त्यांचा जागतिक पातळीवर सन्मान केला जातो. हे टीनपाट लोक उठतात आणि मोदींबद्दल बोलू लागतात. नरेंद्र मोदी हे देशाचं नेतृत्व करतात, मोदींमध्ये जगाचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे. परंतु, मला वाटतं. लायकी नसलेले लोक अशी वक्तव्ये करत असतात.

हे ही वाचा >> हमासने इस्रायलवर हल्ला का केला? अमेरिकेने सांगितलं मोठं कारण

आमदार संजय शिरसाट म्हणाले, ज्या दिवशी माझी बोलायची वेळ येईल त्यावेळी मी या सर्वांना नग्न करून टाकेन, थोडं थांबा, मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलू द्या, त्यांची परवानगी घेऊ द्या, मग यांच्याकडे पाहतो.

Story img Loader