शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून जोरदार हल्लाबोल होत आहे. शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन चंद्रकात पाटील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ४० बंडखोर आमदारांचा समाचार घेतला. तसेच पाटील आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. बाळासाहेबांच्या अपमानावर केवळ खुलासे चालणार नाहीत. तुम्ही (शिंदे गट) यावर नाराजी कसली व्यक्त करताय, अपमान करणाऱ्यांच्या ढुंगणावर लाथा मारा. असा इशारा राऊत यांनी दिला. राऊत यांच्या या टीकेला शिवसेनेच्या शिंदे गटाकडून सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय शिरसाट म्हणाले की, काल जो प्रकार झाला त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. मुळात बाबरीचं पतन झालं तेव्हा तिथे हजारो हिंदू होते. तिथे रामलल्लांचं मंदिर बांधायचं आहे, या एकाच विचाराने सर्वजण एकत्र आले होते. तिथे कोण होते, कोण नव्हते यावर चर्चा करण्यात काही अर्थ नाही. चंद्रकांत पाटलांच्या माफीनंतर तो विषय संपला आहे. पण दुसऱ्या दिवशी संजय राऊत म्हणाले त्यांच्या ढुंगणावर लाथा मारा, त्यावर मी म्हणेन की, पहिली लाथ ही संजय राऊतच्या ढुंगणावर मारली पाहिजे.
हे ही वाचा >> “अजित पवार भाजपाबरोबर जाणार आहेत आणि …”, अंजली दमानियांच्या ट्वीटची जोरदार चर्चा
संजय शिरसाट म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी गद्दारी करणारा पहिला कोण होता तर तो संजय राऊत होता. त्याने पक्षात फूट पाडली, त्याने भाजपासोबतची युती तोडली आणि आघाडी करायला लावली, त्यामुळे पहिली लाथ ही त्याच्या ढुंगणावर मारली पाहिजे. चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल प्रश्न केल्यावर संजय शिरसाट म्हणाले की, “चंद्रकांतदादा हा आमच्यासाठी छोटा विषय आहे. फार मोठा विषय नाही. तुम्ही (ठाकरे गट) केवळ घोषणा आणि टोमणे मारण्याशिवाय दुसरं काहीतरी करा.