भाजपाबरोबर पॅचअप करू शकलो असतो. पण, माझ्या नितिमत्तेत ते बसत नव्हते, असं विधान शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. यावरून आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. “काँग्रेस आणि राष्ट्रवादीला निवडणुकीत चोर, दरोडेखोर म्हटलं. त्यांच्याबरोबर जाणं ही नितीमत्ता होती का? शरद पवारांनी टाकलेली गुगली ही, पक्षाला डुबवून गेली, असा हल्लाबोल संजय शिरसाटांनी उद्धव ठाकरेंवर केला. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
संजय शिरसाट म्हणाले, “राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर जाणं, हे शिवसेनाप्रमुखांचे विचार होते का? हे नितिमत्तेत बसतं का? काँग्रेस आणि राष्ट्रवादीला निवडणुकीत चोर, दरोडेखोर म्हटलं. त्यांच्याबरोबर जाणं ही नितिमत्ता होती का? आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी कुठं आहे? तुम्ही कुठे आहात? शरद पवारांनी टाकलेली गुगली ही पक्षाला डुबवून गेली.”
हेही वाचा : “आम्ही बसलो, तर सरकार बसेल, आम्ही उठलो, तर…”, बच्चू कडू यांचं विधान
“प्रत्येक चुकीचा परिणाम ठाकरे गटाला भोगावा लागत आहे”
आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्यास विधानसभा अध्यक्षांकडून वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात येतो. याबद्दल विचारल्यावर संजय शिरसाटांनी म्हटलं, “ती कायदेशीर बाब असते, हेच या लोकांना कळत नाही. त्यामुळे पक्षाची अशी गत झाली आहे. प्रत्येक चुकीचा परिणाम ठाकरे गटाला आजही भोगावा लागत आहे. तरीही ते जिद्दी असून, हार मानण्यास तयार नाहीत. आम्ही कायद्याला धरून उत्तर दिलं आहे.”
हेही वाचा : “फोडाफोडीचे संस्कार कुणाचे ते देशाला…”, सुप्रिया सुळेंच्या आरोपानंतर बावनकुळेंचं रोखठोक उत्तर
“…तर ही वेळ उद्धव ठाकरेंवर आली असती का?”
मुख्यमंत्री असल्याने आमदारांना डांबून ठेवलं असतं, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. याबद्दल प्रश्न विचारल्यावर संजय शिरसाट म्हणाले, “डाबूंन ठेवण्याचा प्रश्न येतोच कुठं? उद्धव ठाकरेंनी आमचं ऐकावं म्हणून त्यांच्या दरवाज्याच्या बाहेर आम्ही उभे होतो. पण, तुम्ही स्वत:ला डांबून ठेवलं होतं. आमचं ऐकलं असतं, तर ही वेळ आली असती का?”