Sanjay Shirsat On Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीला विधानसभेच्या निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर आता महाविकास आघाडीत खटके उडायला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांकडून एकमेकांवर टीका टिप्पणी केली जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडी तुटणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. यातच आता शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी मोठा दावा केला आहे. महाविकास आघाडी तुटणार असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलंय. तसेच शरद पवारांची भूमिका दिवसेंदिवस बदलत असून त्यांचा गट लवकरच सत्तेत सहभागी होईल, असा मोठा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे.
संजय शिरसाट काय म्हणाले?
“महाविकास आघाडीत मिठाचा खडा टाकण्याचं काम शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी राहणार नाही. काँग्रेसला ठाकरे गटाची मुळात गरज नाही. तसेच शरद पवार यांची भूमिका दिवसेंदिवस बदलत आहे. याचा अर्थ असा की आपल्याला आता सत्तेत जायचंय. सत्तेशिवाय आपण राहू शकत नाही, असं मन परिवर्तन होऊन ते युतीच्या बरोबर येण्याच्या प्रयत्नात आहेत किंवा अजित पवारांच्या बरोबर जाण्याचा त्यांचा (शरद पवार गटाचा) प्रयत्न असेल. तसेच तुम्हाला हे एका महिन्याभरात दिसून येईल”, असा मोठा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे. ते टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहीनीशी बोलत होते.
‘मविआच्या नेत्यांनी एकमेकांच्या विरोधात काम केलं’
“महाविकास आघाडी टिकणार नाही, याचं कारण म्हणजे निवडणुकीत त्यांच्या नेत्यांनी एकमेकांच्या विरोधात काम केलं. तसेच शरद पवार देखील त्यांच्याबरोबर राहण्यास आता इच्छुक नाहीत. महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नाही. याचा अर्थ महाविकास आघाडीतील कोण कोणाच्या बरोबर जाईल हे तुम्हाला महिनाभरात दिसेल. ठाकरे गटाचं महत्व आता संपलं. ठाकरे गटाला काँग्रेस किंवा शरद पवार गट बरोबर घेणारच नाही. त्यामुळे आता ठाकरे गटाचे कार्यकर्तेही अस्वस्थ आहेत. तसेच ठाकरे गटाचे काही नगरसेवक नाराज आहेत, कारण महापालिकेच्या निवडणुका आलेल्या आहेत. ठाकरे गटातील नाराज नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत”, असं संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
‘शरद पवार गट कुठे असेल हे एका महिन्यात दिसेल’
“शरद पवार गट वेगळ्या दिशेने चालली आहे. शरद पवार गट आता एका महिन्यात महाविकास आघाडीत राहणार नाही. राष्ट्रवादी शरद पवार गट कुठे असेल हे तुम्हाला पुढील एका महिन्यात दिसेल. शरद पवारांचा गट अजित पवारांच्या गटात विलीन होऊ शकतो. काहीही सांगता येत नाही. सध्या एकमेकांच्या खासदारांना फोन केल्याच्या चर्चा आहेत. याचा अर्थ ते एकमेकांशी जुळून घेण्याच्या मनस्थितीत असावेत”, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं.