छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटात लोकसभा उमेदवारीवरून सुरू असलेली पक्षांतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. छत्रपती संभाजीनगरमधून माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यात उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे. चंद्रकांत खैरे आपल्याला सातत्याने डावलत असल्याचा आरोप करत अंबादास दानवे यांनी नाराजी व्यक्त केली. यातच आता शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत छत्रपती संभाजीनगरमधून महायुतीचे उमेदवार कोण असणार? हे सांगितले आहे. तसेच संजय शिरसाट यांनी काही सूचक विधानेही केले आहेत. त्यांच्या विधानाचा रोख कुणाच्या दिशेने होता? याची चर्चा आता छत्रपती संभाजीनगरमध्ये रंगली आहे.
संजय शिरसाट काय म्हणाले?
“आता जो असंतोष चाललेला आहे, याची वाट कुठे असेल तर ती एकनाथ शिंदे यांच्या दिशेने आहे, म्हणून एकनाथ शिंदे यावर सोमवारी निर्णय घेतील”, असे संजय शिरसाट म्हणाले. तसेच “शिंदे सेनेचे नेते ‘त्यांच्या’ संपर्कात आहेत का?”, असा प्रश्न विचारण्यात आला असता यावर संजय शिरसाट यांनी सांगितले, “शिवसेनेचे नेते संपर्कात आहेत किंवा शिवसेनेचे नेते त्यांना इकडे येण्यासाठी पायघड्या टाकतात, अशातला कोणताही भाग नाही.
पक्षात जे शिवसैनिक आहेत, ज्यांनी शिवसेना प्रमुखांच्या आदेशानुसार, शिवसेना वाढवली. पण, आता त्यांची कोंडी होत आहे. पक्षात नवीन येणारे त्यांच्यावर ‘बॉसगिरी’ करतात. जे काल आले ते तातडीने दुसऱ्या दिवशी नेते होऊन यांना आदेश करतात. त्यांच्याबद्दल असलेला असंतोष आणि शिवसैनिकांकडे असलेले वरिष्ठांचे दुर्लक्ष, याचा परिणाम पक्ष सोडण्यामध्ये होत आहे. त्यामुळे आम्ही बोललो किंवा नाही बोललो, तरी त्यांना माहीत आहे की, आपण शिवसेना सोडत नाही तर खऱ्या शिवसेनेकडे जात आहोत. त्यामुळे आमच्याकडे प्रवेश होत आहेत”, असे सूचक विधान संजय शिरसाट यांनी केले.
हेही वाचा : घोटाळ्यामुळं भाजपा तडीपार होणार’, संजय राऊत यांचे भाजपावर टीकास्र
छत्रपती संभाजीनगरचा उमेदवार कोण असणार?
लोकसभा निवडणुकीसाठी छत्रपती संभाजीनगरचा उमेदवार कोण असणार? यावर संजय शिरसाट यांनी भाष्य केले. ते म्हणाले, “छत्रपती संभाजीनगरचा उमेदवार हा भाजपाचा नाही तर शिवसेनेचा असणार, हे जवळपास निश्चित आहे. आमच्याकडे चार उमेदवार आहेत. त्यापैकी एकाचे नाव सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाहीर करतील. यामध्ये मंत्री संदीपान भुमरे, राजेंद्र जंजाळ आणि अजून दोन नावे आहेत. पण त्यांना सध्या ‘सिक्रेट’ ठवेलेले बरे”, असे संजय शिरसाट म्हणाले.
‘सिक्रेट’ नावामध्ये दानवे आहेत का?
छत्रपती संभाजीनगरचा उमेदवार कोण असणार, याबाबत संजय शिरसाट यांनी चार पैकी एकजण असणार असे सांगत दोन ‘सिक्रेट’ नावे असल्याचे सांगितले. “‘सिक्रेट’ नावामध्ये दानवे आहेत का?”, असा प्रश्न विचारण्यात आला असता संजय शिरसाट म्हणाले, “सध्या ‘सिक्रेट’मध्ये जे आहे, त्यांना ‘सिक्रेट’मध्ये राहुद्या. मात्र, सोमवारी सर्वांना कळेल. सोमवारी अनेक पक्षप्रवेश होणार आहेत, त्यामध्ये कोण-कोण असेल हे सोमवारी कळेल”, असे संजय शिरसाट यांनी सांगितले.