Sanjay Shirsat vs Shivsena UBT Sanjay Raut : नवी दिल्ली येथे ९८ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नुकतंच पार पडलं. साहित्य संमेलनाच्या ‘असे घडलो आम्ही’ या कार्यक्रमात शिवसेनेच्या (शिंदे) नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेवर (ठाकरे) गंभीर आरोप केले. “ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज कार दिल्यावर एक पद मिळायचं”, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. त्यावर ठाकरे गटातील नेत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राज्यसभेचे खासदार संजय राऊत म्हणाले, “साहित्य संमेलन हे अशा राजकीय चिखलफेकीसाठी आयोजित केलं होतं का? सध्याच्या साहित्य महामंडळाची त्यास मान्यता आहे का? नसेल तर साहित्य महामंडळाने त्वरित माफी मागावी. त्याचबरोबर नीलम गोन्हे यांनी साहित्य संमेलनाच्या मंचावरून बाहेर पडताच वार्ताहरांना सांगितल की “मी महामंडळाच्या सदस्यांना ५० लाख रुपये देऊन या कार्यक्रमात सहभागी झाले आणि उषा तांबे यांना त्याआधी मी एक मर्सिडीज कार भेट देऊन या कार्यक्रमाचे आयोजन करायला लावले”. हे खरे की खोटे माहीत नाही, पण महामंडळाच्या प्रतिष्ठेला त्यामुळे धक्का बसला आहे.

संजय राऊत यांच्यासह सुषमा अंधारे, अविनाश पांडे आणि इतर अनेक नेत्यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर पलटवार केला आहे. तसेच, ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात आंदोलनही केलं. त्यानंतर आता शिवसेनेचे (शिंदे) नेते व मंत्री संजय शिरसाट यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच ते म्हणाले, उबाठा गटाने पैसे घेऊन मराठवाड्यात विधानसभेची तिकीटं दिली.

“उबाठा गटाने पैसे घेऊन उमेदवाऱ्या दिल्या” : संजय शिरसाट

संजय शिरसाट म्हणाले, “शिवसेना उबाठा गटाने विधानसभा निवडणुकीत ज्या ज्या लोकांना तिकीटं दिली त्यांना जाऊन विचारा की त्यांच्याकडून किती रुपये घेतले. मी माझ्या जिल्ह्याचं सांगतो. विधानसभा निवडणुकीत उबाठा गटाने माझ्याविरोधात ज्याला उमेदवारी दिली होती तो पक्षात येऊन केवळ आठच दिवस झाले होते. तरी देखील उबाठा गटाने त्याला तिकीट दिलं. मग २५-३० वर्षांपासून जे लोक शिवसेनेत होते त्यांना तिकीट का दिलं नाही? आणि ज्याला त्यांनी तिकीट दिलं तो उमेदवार आज कुठे आहे माहिती आहे का?”

शिवसेनेचे (शिंदे) नेते म्हणाले, “वैजापूर विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाने एका व्यापाऱ्याला तिकीट दिलं होतं. त्या व्यापाऱ्याने तिकीट घेऊन निवडणूक लढवली आणि आज तो भाजपात गेला आहे. सिल्लोडचा उमेदवार देखील पूर्वी भाजपात होता. निवडणुकीसाठी ठाकरे गटात गेला. निवडणूक झाल्यावर तो परत भाजपात गेला. पैठणच्या उमेदवारानेही तेच केलं. मराठवाड्यात अनेक मतदारसंघात उबाठा गटाने अनेकांना अशी तिकीटं वाटली. त्याचा परिणाम असा झाला की जे शिवसैनिक अहोरात्र पक्षासाठी काम करत होते, ज्यांनी पक्षासाठी काम केलं आहे. पक्षासाठी लाठ्याकाठ्या खाल्या ते बाजूला पडले आणि इतर दलालांना तिकीटं मिळाली. जो दलाल आज या सगळ्यावर बोलत आहे त्याचं उखळ त्याने पांढरं करून घेतलं आहे.

Story img Loader