राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. शरद पवारांच्या राजीनाम्यामागे विविध राजकीय कंगोरे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’तील अग्रलेखातून शरद पवारांच्या राजीनाम्यावर भाष्य केलं आहे. अजित पवारांचा एक गट भाजपात जाण्याच्या मार्गावर आहे, यामुळेच शरद पवारांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असावा, अशी शक्यता संजय राऊतांनी वर्तवली.

‘सामना’ अग्रलेखातून केलेल्या टीकेनंतर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी संजय राऊतांवर टीकास्र सोडलं. संजय राऊत हे प्रत्येकवेळी इतर पक्षांच्या कामात हस्तक्षेप करतात. त्यांना दुसऱ्यांच्या घरात वाकून पाहण्याची सवय झडली आहे. त्यांना हा रोग झाला आहे, अशी बोचरी टीका संजय शिरसाट यांनी केली. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

हेही वाचा- “उद्धव ठाकरे दुतोंडी सापाची…”, बारसू दौऱ्यावरून रामदास कदमांची टीका

“अजित पवारांचा एक गट भाजपात जाण्याच्या मार्गावर आहे” या संजय राऊतांच्या विधानाबाबत विचारलं असता संजय शिरसाट राऊतांचा एकेरी उल्लेख करत म्हणाले, “संजय राऊत हा प्रत्येकवेळी इतर पक्षांच्या कामात हस्तक्षेप करतो. त्याबद्दल कित्येकवेळा त्याने शिव्याही खाल्ल्या आहेत. त्या नेत्यांचे बोलणेही खाल्ले आहेत, तरीही तो सुधरायचा प्रयत्न करत नाही.”

हेही वाचा- “दोन दिवसांनंतर तुम्हाला…”, राजीनामा मागे घेण्याच्या मागणीवर शरद पवारांचं सूचक विधान; कार्यकर्त्यांना केलं आश्वस्त!

“संजय राऊतांना दुसऱ्यांच्या घरात वाकून पाहण्याची सवय झडली आहे. त्याला हा एक रोग झाला आहे, म्हणून त्याने असं विधान केलं आहे. शरद पवार किंवा त्यांच्या पक्षात चाललेल्या घडामोडी आपण बाहेरून बघितल्या पाहिजे. त्यांना शहाणपणा शिकवायला तुम्हाला कुणी सांगितलं?” असा सवालही संजय शिरसाट यांनी संजय राऊतांना विचारला.

Story img Loader