काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली होती. “सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसले”, असा हल्लाबोल अमित शाहांनी उद्धव ठाकरेंवर केला होता. यावर, ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनीही शाहांवर टीकेचे बाण सोडले होते. संजय राऊतांनी अमित शाहांवर केलेल्या टीकेवरून शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमित शाहांनी ठाकरे गटावर टीका केल्यानंतर संजय राऊतांनी प्रत्यूत्तर दिलं होतं. “अमित शाह यांना ठाकरे गटाचा धसका घेतला आहे”, असं संजय राऊत म्हणाले होते. यावर संजय शिरसाट म्हणाले की, “संजय राऊत यांनी ही टीका केलेली नाही. त्याला चोमडेपणा म्हणतात आमच्या मराठीत. कोणाची तळी कशी उचलायची याचा प्रयोग संजय राऊत यांनी केला आहे. कसला धसका घेतला आहे? अमित शाह कुठे, उद्धव गट कुठे? कुठेतरी बरोबरी करा, तुलना करा ना. परंतु, यांनी दरवेळेला ठाकरेंच्या कानात सांगून सांगून आपला रुबाब मोठा, आपण मोठे आहोत, सगळा देश तुम्हाला घाबरतो, या अविर्भावात सांगत होतात यामुळे गटाचं अधःपतन झालं आहे. अमित शाह काय धसका घेणार? तुम्हाला सांभाळता आलं नाही. तुमच्या छातीवर चढून तुमची सत्ता गेली हे मान्य करा ना. तुमची सत्ता गेली हे मान्य करायला काय जातं? परंतु, गिरे तो भी टांग उपर हा प्रकार होतोय”, असं संजय शिरसाट म्हणाले. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.

हेही वाचा >> “…म्हणजे अजूनही ‘मातोश्री’चा धसका कायम आहे,” संजय राऊतांचं अमित शाहांना प्रत्युत्तर

“गद्दार कोण आहे, हा गट आहे. बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली, मातीत गाडलं. ज्या काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जायचं नव्हतं, पण ते गेले. आम्ही कोणाच्या मांडीवर जाऊन बसलो नव्हतो, ते गेले. सिल्वर ओकला नतमस्तक झाले. आम्ही नाही नतमस्तक झालो. आम्ही स्वाभिमानाने लढलो. शिवसेनाप्रमुख दैवत असल्याने आम्ही ताठ मानेने बोलतो. आम्हाला झुकावं लागत नाही. ज्या मातोश्रीवर अमित शाह यायचे, नरेंद्र मोदी यायचे, राष्ट्रपती पदाचे उमेदवार यायचे ती मातोश्री लोकांच्या दारावर कटोरा घेऊन जाते याचं दुःख आम्हाला होतंय. त्यामुळे करणारा करविता आहे, संजय राऊतांसारखा पागल लोक आहेत या देशात. महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली ही कीड आहे. या किडीमुळेच ठाकरे गटाचं अधःपतन झालं आहे. म्हणून त्यांनी आमच्यावर टीका करण्यापेक्षा तुम्ही तुमचा पक्ष सांभाळा. उद्धव ठाकरे जोवर यांच्या पाठीत लाथ घालत नाही तोपर्यंत त्या पक्षाला चांगले दिवस येणार नाहीत”, अशी खरमरीत टीका संजय शिरसाटांनी यावेळी केली.

अमित शाह काय म्हणाले होते?

भाजपातर्फे देशभरात ‘मोदी @ ९’ अभियान राबविले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील पहिली सभा शनिवारी नांदेडमध्ये पार पडली. तेव्हा बोलताना अमित शाह यांनी म्हटलं, “ज्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी भाजपाबरोबर निवडणूक लढवली होती, ते हिंदुत्व आता कुठं आहे. केवळ सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसले.”

हेही वाचा >> Video : बिपरजॉय चक्रीवादळ दिशा बदलणार? पाकिस्तान नव्हे, आता गुजरातच्या दिशेनं वळवला मोर्चा; सतर्कतेचा इशारा!

संजय राऊतांनी काय प्रत्युत्तर दिलं होतं?

“शिवसेना फोडली, नाव आणि धनुष्यबाण गद्दार गटास लबाडी करून दिले. तरी देखील डोक्यात ठाकरे आणि शिवसेनेचे भय कायम आहे. ये डर अच्छा है. जे प्रश्न त्यांनी उध्दव ठाकरे यांना विचारले, त्यावर खरे तर भाजपाने त्यावर चिंतन करायला हवे. पण, ते स्वतःच निर्माण केलेल्या जाळ्यात स्वतःच अडकले. एवढा धसका घेतलाय,” असं संजय राऊतांनी सांगितलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay shirsat criticize to sanjay raut saying he is insect of maharashtras politics sgk