राष्ट्रवादी काँग्रेसने उद्धव ठाकरे गटाला दत्तक घेतलं आहे, अशी खोचक टीका शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केली आहे. टीव्ही ९ या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही टीका केली. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यावरून संजय राऊतांनी केलेल्या आरोपालाही उत्तर दिलं. तसेच खोक्यांच्या घोषणेला आता जनता कंटाळली आहे, असा टोलाही त्यांनी महाविकास आघाडीला लगावला.
हेही वाचा – “मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी आतंकवाद्यांसाठी…”; उमेश कोल्हे हत्या प्रकरणावरून भाजपाचा हल्लाबोल
नेमकं काय म्हणाले संजय शिरसाट?
“ ”दिशा सालियन प्रकरणावरून सभागृहात गोंधळ सुरू असताना याविरोधात केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आक्रमक झाले होते. ठाकरे गटाचे आमदार सुद्धा शांत होते. म्हणजे, राष्ट्रवादीनं उद्धव ठाकरे गटाला दत्तक घेतल्यासारखे ते भांडत होते. हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं आहे. पायऱ्यावर झालेल्या आंदोलनातही राष्ट्रवादी पुढं असल्याचे दिसून येते, अशी खोचक टीका संजय शिरसाट यांनी केली आहे.
दरम्यान, नागपूर NIT घोटाळ्याचे कागदपत्रं तपास यंत्रणांच्या हाती लागली असून हे प्रकरण दाबण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला जात आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी आज माध्यमांशी केला होता. राऊतांच्या या आरोपाही संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं. “संजय राऊत यांनी परवाचा उच्च न्यायालयाचा निकाल वाचलेला नाही. त्यांनी थोडा अभ्यास करण्याची गरज आहे. जो घोटाळा झालाच नाही, तो दाबण्यासाठी दिल्लीला जाण्याची आवश्यकता नाही. तपास यंत्रणा त्यांच्या प्रमाणे काम करत असते. तपास यंत्रणा कोणालाही सोडत नाही. प्रकरण दाबण्यासारख्या छोट्या गोष्टीसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला जाण्याची आश्यकता नाही”, असे ते म्हणाले.
“महाविकास आघाडीचे नेते सभागृहात येऊन ‘५० खोके एकदम ओके’ म्हणतात. मात्र, आता जनताही या घोषणांना कंटाळली आहे. सत्तेत असताना स्वत:चे पाप लपवण्यासाठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे, असा टोलाही त्यांनी महाविकास आघाडीला लगावला. खोके सरकार म्हणणाऱ्यांकडे दुसरे विषय नाही. मुंबई महापालिकेमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबाबत दिवाकर रावते, अनिल परब, सुभाष देसाई, संजय राऊत यांनी बोलावं”, असे आव्हानही त्यांनी दिले.