आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव करण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र यावं, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं आहे. ठाकरेंच्या या आवाहनानंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदाचा मुख्य चेहरा कोण असेल? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. अशातच काल संजय राऊत यांनी पंतप्रधान पदासाठी उद्धव ठाकरे उत्तम चेहरा आहे, असं विधान केलं. त्यांच्या या विधानानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया येत असताना शिंदे गटाचे नेते तथा आमदार संजय शिरसाट यांनी या विधानावरून राऊतांवर टीकास्र सोडलं आहे. टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा – “जर मर्द असाल तर…” संजय राऊतांचं शिंदे गटाला थेट आव्हान; ठाण्यातील प्रकारावर घेतलं तोंडसुख!
काय म्हणाले संजय शिरसाट?
संजय राऊत हे रोज काही ना काही नवीन विधानं करत असतात. हा त्यांचा आवडता छंद आहे. उद्धव ठाकरेंची उमेदवारी जाहीर करणारे संजय राऊत कोण आहेत? मुळात संजय राऊत हा एक कारकून आहे. तो काय उद्धव ठाकरेंची उमेदवारी जाहीर करेल. याबाबत उद्धव ठाकरे किंवा महाविकास आघाडीतील जे महत्त्वाचे नेते आहेत, ते ठरवतील. मला पूर्ण विश्वास आहे की संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळेच तो नको ती बडबड करतो, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली.
हेही वाचा – “…मज्जा आहे बाबा एका माणसाची”, मनसेचा ठाकरे गटाला टोला; पंतप्रधानपदाचा केला उल्लेख!
संजय राऊत नेमकं काय म्हणाले होते?
सोमवारी एका पत्रकार परिषदेदरम्यान २०२४ लोकसभा निवडणुकीच्या व्यूहरचनेनुसार उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदाचा चेहरा असतील का? असा प्रश्न राऊतांना विचारण्यात आला होता. यासंदर्भात बोलताना, “राजकारणात काहीही घडू शकतं. उद्धव ठाकरे हा एक उत्तम चेहरा आहे. महाविकास आघाडीने ठरवलं होतं की, उद्धव ठाकरे जर मुख्यमंत्री होणार असतील तर आपण एकत्र येऊ आणि सरकार स्थापन करू…आज विरोधी पक्षात जे प्रमुख चेहरे आहेत. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा चेहरा अनेकांना महत्त्वाचा वाटतो. कारण एकतर महाराष्ट्र मोठं राज्य आहे. ते ठाकरे आहेत. ते हिंदुत्ववादी आहेत. अशा अनेक गोष्टी आहेत. याचा विचार भविष्यात आमचे इतर सहकारी करू शकतात”, असे ते म्हणाले होते.