मागील काही दिवसांपासून ठाकरे गटाचे नेते ’शिवगर्जना’ यात्रेच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधत असून याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेही आज रत्नागिरीतील खेड येथे जाहीर सभा घेणार आहेत. दरम्यान, या सभेपूर्वी आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्र सोडलं आहे. उद्धव ठाकरे हे सध्या धृतराष्ट्राच्या भूमिकेत असून त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली आहे आणि संजय राऊत जे सांगतात तेवढंच ते करतात, असे ते म्हणाले. टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा – भविष्यात काँग्रेसचा ‘हात’ सोडणार का? रवींद्र धंगेकरांनी स्पष्टच दिलं उत्तर; म्हणाले…
काय म्हणाले संजय शिरसाट?
“उद्धव ठाकरेंच्या खेडमधील सभेचा मुख्य उद्देश राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदाराचा पक्ष प्रवेश करणे एवढाच आहे. त्याशिवाय या सभेत वेगळं काहीही नाही. त्यांची ठराविक वाक्य, तीच टीका आणि त्यांच्या भाषणावर टाळ्या वाजवणारे तेच चमचे, एवढंच या सभेत असणार आहे. उद्धव ठाकरे हे सध्या धृतराष्ट्राच्या भूमिकेत आहेत. त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली आहे आणि संजय राऊत जे सांगतात तेवढंच ते करतात. आजच्या खेडमध्ये सभेला मुस्लिमांना उपस्थित राहण्यासाठी आवाहन करण्यात आलं आहे. हेच उद्धव ठाकरेंच हिंदुत्त्व आहे”, अशी टीका आमदार संजय शिरसाट यांनी केली आहे.
संजय राऊत यांनाही केलं लक्ष्य
पुढे बोलताना त्यांनी संजय राऊत यांनाही लक्ष्य केलं. “संजय राऊत काल धंगेकर यांच्या भेटीला गेले. ते काय करत आहेत, हे अजूनही त्यांना कळलेलं नाही. नुकताच झालेल्या विधान परिषदेत त्याचा एकही उमेदवार नव्हता, पुण्याच्या पोटनिवडणुकीतही त्यांचा उमेदवार नव्हता. मुळता संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना संपवण्याचा विळा उचलला आहे. काल त्यांनी ‘कसबा तो झाकी है महाराष्ट्र अभी बाकी है’, असा डायलॉग मारला. मुळात ‘कसबा तो झाकी है उद्धव साहब को डुबाना अभी बाकी है’, असा त्याच अर्थ होतो”, अशी खोचक टीका त्यांनी केली.
“औवेसी-जलील हे हैदराबादचे पार्सल”
यावेळी बोलताना त्यांनी नामांतराच्या मुद्द्यावरून एमआयएम करत असलेल्या आंदोलनावरही प्रतिक्रिया दिली. “जलील यांनी काल जे आंदोलन केलं, त्यात औरंगजेबाचे फोटो झळकले. मी यापूर्वीही सांगितलं आहे की, ही निझामांची औलाद आहेत. औवेसी आणि जलील हे दोघंही हैदराबादचे पार्सल आहे. म्हणून त्यांना या शहरात त्यांच्या वशंजांचं नाव ठेवायचं आहे. मात्र, असे प्रकार आम्ही सहन करणार नाही”, अशी टीका शिरसाट यांनी केली.
हेही वाचा – मटण खाऊन देवदर्शन केल्याचा विजय शिवतारेंचा आरोप; सुप्रिया सुळे म्हणाल्या, “यासंदर्भात मी…”
“सुप्रिया सुळे आठवड्यातले सातही दिवस मटण खातात”
दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी मटण खाऊन देवदर्शन केल्याचा आरोप विजय शिवतारे यांनी केला होता. यावरही शिरसाट यांनी भाष्य केलं. “माझ्या माहितीप्रमाणे सुप्रिया सुळे आठवड्यातले सातही दिवस मटण खातात. मटण खाऊन मंदिरा जावं की नाही, हा त्यांचा विषय आहे. पण मटण खाऊन मंदिराच्या ठिकाणी जाऊ नये, असा नियम आहे. हा पाळायला हवा”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.