एकीकडे राज्यात अजित पवारांची बंडखोरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट याची चर्चा असताना दुसरीकडे शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दाही चर्चेत आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आमदार अपात्रतेचा निकाल प्रलंबित असताना त्यावर विधानसभा उपाध्यक्ष आणि नुकतेच अजित पवार यांच्यासमवेत सरकारमध्ये सामील झालेले नरहरी झिरवळ यानी प्रतिक्रिया दिली. मात्र, ही प्रतिक्रिया न रुचल्यामुळे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी नरहरी झिरवळांना खोचक सल्ला दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले होते नरहरी झिरवळ?

वास्तविक शरद पवारांसमवेत विरोधात असताना नरहरी झिरवळ यांनी शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सुनावणीसाठी आपल्याकडेच येईल असा दावा केला होता. मात्र, आता सत्तेत गेल्यानंतर झिरवळ यांनी यासंदर्भात अंतिम निर्णय विधानसभा अध्यक्षांचाच असेल, असं ठाम प्रतिपादन केलं आहे.

“एकूण सगळ्या बाजूंचा जर विचार केला तर शिंदे गटातील १६ आमदार अपात्र होऊ शकतात. पण याबाबत अंतिम अधिकार विधानसभा अध्यक्षांचे आहेत. त्यामुळे त्याबद्दल मी भाष्य करणं योग्य नाही”, असं नरहरी झिरवळ यांनी माध्यमांना सांगितलं.

अपात्रतेच्या नोटिशीवर उत्तर देण्यास फक्त सात दिवसांचा कालावधी; संजय शिरसाट म्हणाले, “आमचे वकील…”

दरम्यान, नरहरी झिरवळ यांनी केलेला हा दावा शिंदे गटाचे आमदार आणि अपात्रतेची टांगती तलवार असणारे संजय शिरसाट यांनी मात्र नाकारला आहे. “झिरवळांना मी सांगतो की त्यांनी अपेक्षेपेक्षा जास्त बोलू नये. तुम्हाला जो अधिकार नाही, त्या अधिकारावर माणसानं बोलू नये”, असं संजय शिरसाट म्हणाले आहेत.

मंत्रीमंडळ विस्तार की खातेवाटप?

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असणारा मंत्रीमंडळ विस्तार व गेल्या आठवड्याभरापासून प्रलंबित असणारं खातेवाटप नेमकं कधी होणार? याविषयी तर्क-वितर्क लावले जात आहेत. यासंदर्भात उदय सामंत यांनी माध्यमांशी बोलताना “काही तासांत खातेवाटप होईल. दोन तास, २० तास, ७२ तास माहिती नाही”, अशी सूचक प्रतिक्रिया दिली. “एक ते दोन दिवसांत मंत्रीमंडळ विस्तार होईल असं वाटतंय”, असं संजय शिरसाट म्हणाले. तर “कोणतं खातं कुणालाही मिळालं, तरी नियंत्रण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं असेल यात दुमत असण्याचं कारण नाही”, असा स्पष्ट निर्धार भरत गोगावले यांनी व्यक्त केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay shirsat eknath shinde faction slams narhari zirwal ajit pawar group ncp pmw