Sanjay Shirsat On Bhaskar Jadhav : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. मात्र, असं असतानाच ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. राजन साळवी यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यातच ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी दोन दिवसांपूर्वी एक व्हॉट्सॲप स्टेट्स ठेवलं आणि कोकणाच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं. भास्कर जाधव देखील ठाकरेंची साथ सोडणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या. आता शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी भास्कर जाधव यांना थेट पक्षात येण्याची ऑफरच दिली आहे. “मेंढ्याच्या कळपात राहण्यापेक्षा आता वाघांच्या कळपात या”, असं सूचक विधान संजय शिरसाट यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
संजय शिरसाट काय म्हणाले?
भास्कर जाधव यांनी दोन दिवसांपूर्वी एक व्हॉट्सॲप स्टेट्स ठेवलं होतं. त्यांच्या स्टेटस संदर्भात आज पत्रकार परिषदेत संजय शिरसाट यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी शिरसाट म्हणाले, “भास्कर जाधव यांच्या स्टेटसचा अर्थ काय? हे तुम्ही समजून घ्या. त्यांचा म्होरक्या धाडसी नाही, हे त्यांना सांगायचं आहे हे भास्कर जाधव म्हणतात मी नाही. त्यामुळे भास्कर जाधवांची मानसिकता झाली आहे की त्यांच्याबरोबर (ठाकरेंबरोबर) काम करणं अशक्य आहे. याबाबत त्यांनी अनेकदा सुचवलं आहे. मात्र, त्यांना काही लोक विनवण्या करत आहेत. त्या लोकांचं भास्कर जाधव ऐकणार नाहीत”, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.
‘महिनाभरात मोठे बदल होतील’
“भास्कर जाधव माझे मित्र आहेत, मला त्यांचा स्वभाव माहिती आहे. ते एकदा घेतलेल्या निर्णयापासून मागे हटणार नाहीत. त्यांचा त्यांच्या म्होरक्यावर विश्वास राहिला नाही. निर्णय घेण्यासाठी प्रक्रिया असते, त्यामुळे त्यासाठी थोडासा वेळ लागतो. मी तुम्हाला खात्रीने सांगतो की पुढील महिनाभरात अधिवेशनात फार मोठे बदल झालेले दिसतील”, असा मोठा दावा संजय शिरसाट यांनी केला.
‘आता वाघांच्या कळपात या…’
“भास्कर जाधव यांच्यासारखा चांगला आमदार म्हणजे ते अभ्यासू आहेत, स्पष्ट बोलणारे आहेत. त्यामुळे त्यांना माझं सांगणं आहे की मेंढ्याच्या कळपात राहण्यापेक्षा आता वाघांच्या कळपात या”, असं सूचक विधान करत संजय शिरसाट यांनी भास्कर जाधव यांना पक्षात येण्याची ऑफरच दिली आहे. संजय शिरसाट यांच्या या विधानामुळे ठाकरे गटात खळबळ उडाली आहे.
भास्कर जाधव यांनी काय स्टेट्स ठेवलं होतं?
ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी दोन दिवसांपूर्वी एक व्हॉट्सॲप स्टेट्स ठेवलं होतं. ‘म्होरक्या जिद्दी व धाडसी असेल तर माणसंच काय जनावरं सुद्धा विश्वास ठेवतात’, अशा आशयाचं स्टेट्स भास्कर जाधव यांनी ठेवलं होतं. त्यांच्या या स्टेट्सची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली. यावरून भास्कर जाधव यांच्या मनात नेमकं काय चाललंय? याबाबत राजकारणात उपस्थित करण्यात आले.