Sanjay Shirsat On Chandrakant Khaire : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार तयारी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. यासाठी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश नेते देत असल्याचं पाहायला मिळत आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षसंघटना वाढवण्यासाठी नेत्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. यातच आता शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना पक्षात येण्याची खुली ऑफर दिली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे. आमच्या पक्षाचे दरवाजे चंद्रकांत खैरे यांच्यासाठी कायम उघडे असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.
संजय शिरसाट काय म्हणाले?
“शिवसेना ठाकरे गटाचे जे वाचाळवीर आहेत त्यांना माझा सल्ला आहे की तु्म्ही दुसऱ्यांचा चांगुलपणा करण्यापेक्षा जय श्री रामाचं नाव घ्या, तुमचं काहीतरी चांगलं होईल. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्याबाबत मला कधीही राग नाही. कारण त्यांनी प्रामाणिकपणे पक्षाची सेवा केलेली आहे. त्यामुळे मी काल देखील सांगितलं की अशा माणसांसाठी आमच्या पक्षाचे दरवाजे कायम उघडे आहेत. इतरांसाठी नाही, मी त्यांना पक्षात येण्याची अधिकृत ऑफर दिली आहे”, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.
‘चंद्रकांत खैरेंचा जाणूनबुजून पराभव केला’
“खऱ्या अर्थाने हिंदुत्वाची कास आम्ही घेतलेली आहे, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत हे त्यांनी मान्य केलं आहे. त्यामुळे आता त्यांचा आमच्यावर राग नाही आणि आमचा चंद्रकांत खैरे यांच्यावर राग नाही. चंद्रकांत खैरे यांना कायम अडचणीत आणण्याचं काम झालं. तुम्ही पाहिलं असेल की लोकसभेच्या निवडणुकीत दोन्ही वेळा त्यांचा पराभव हा जाणूनबुजून करण्यात आला. त्यामुळे त्यांची अवस्था अशी झाली आहे”, असा आरोप संजय शिरसाट यांनी केला.
“चंद्रकांत खैरे यांनी ‘मातोश्री’ सोडणार नाही असं जाहीरपणे सांगितल्यामुळे आता माघार घेता येत नाही आणि येथे त्यांना कोणी विचारत नाही. त्यांना त्यांच्या पक्षातून कोणी विचारत नसलं तरी आम्ही विचारतो, कारण त्यांनी पक्षात काही दिवस टाकलेले आहेत. त्यामुळे आम्ही त्यांची कदर करतो. ते आमच्याकडे आले तर त्यांचा आम्हाला नक्कीच फायदा होईल. शिवसेना (ठाकरे गट) खिळखिळी करण्याची गरज नाही कारण आधीच त्यांच्या पक्षाचा खुळखुळा झालेला आहे”, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली आहे.