Maharashtra Cabinet Portfolio Distribution : महायुतीला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विजय मिळल्यानंतर राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले आहे. यानंतर महायुतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार देखील करण्यात आला. मात्र अद्याप खाते वाटपाचा निर्णय घेण्यात आलेला आला नाही. यादरम्यान विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात याबद्दल प्रश्न विचारण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी विधान परिषदेमध्ये विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे यासंबंधी विचारणा केली. शिंदे म्हणाले की, “पुरवणी मागण्या सादर झाल्या आहेत. त्या पुरवणी मागण्या विविधा खात्याच्या आहेत. खातेवाटप झाले नसल्याने उत्तर कोण देणार? मुख्यमंत्री सर्व प्रश्नांची उत्तरे देणार की? कोणत्या मंत्र्याला कोणत्या खात्याचे उत्तर द्यायला लावणार याच्या अधिकाराचं पत्र तुम्हाला देणार? त्याचं रूलिंग द्या . मागच्या वेळी जेव्हा असं झालं होतं तेव्हा प्रत्येकाला मुख्यमंत्र्‍यांनी अधिकार दिले होतं. मग कोणत्या प्रश्नाला कोण उत्तर देणार तसं पत्र मागून घ्या म्हणजे आम्ही त्यांना विचारू”, असे शशिकांत शिंदे म्हणाले.

हेही वाचा>> Video: लाडकी बहीण योजनेसाठी निकष बदलणार का? देवेंद्र फडणवीसांचं विधानसभेत मोठं भाष्य; म्हणाले, “एखादी योजना जर…”

दरम्यान शशिकांत शिंदे यांच्या प्रश्नावर शिवसेना (शिंदे) पक्षाचे आमदार यांनी उत्तर दिले. यावेळी शिरसाट यांनी महायुतीच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप कदाचित आजच होण्याची शक्यता असल्याचेही म्हटले आहे. “उद्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेला सुरूवात होईल. त्या आगोदर याला कोण उत्तर देईल? या मागण्या संदर्भात कोणाची नेमणूक होईल… कदाचित आजच मंत्र्यांना खाते वाटप होण्याची शक्यता आहे, त्यामुळे उद्या तशी वेळ येणार नाही आणि आलीच तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उत्तरे देतील”, असे संजय शिरसाट म्हणाले.

विधानसभा निवडणुकीत महायुतीचा मोठा विजय

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजाच्या नेतृत्वातील महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं. महायुतीने २८८ पैकी तब्बल २३५ जागा जिंकत विरोधकांचा धुव्वा उडवला. विरोधकांच्या महाविकास आघाडीला केवळ ४९ जागा जिंकता आल्या. मात्र मोठं बहुमत मिळवूनही महायुतीला सत्तास्थापनेसाठी १२ दिवस लागले. पाच डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने सत्तास्थापन केली. फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांनी देखील उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

दरम्यान, राज्यातील जनतेला महायुती सरकारच्या विस्ताराची प्रतीक्षा होती. अखेर सत्तास्थापनेनंतर १० दिवसांनी आज (१५ डिसेंबर) नागपुरात महायुती सरकारचा विस्तार झाला. महायुतीच्या एकूण ३९ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र अद्याप या नेत्यांना खात्याची जबाबदारी देण्यात आलेली नाही.

Story img Loader