निवडणूक आयोगानं ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठावलं आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी तीन नवीन चिन्हे निवडणूक आयोगाकडे सादर केली आहेत. यामध्ये उगवता सूर्य, धगधगती मशाल आणि त्रिशूळ अशा चिन्हांचा समावेश आहे. पण ही चिन्हं निवडणूक आयोगाच्या यादीत नसल्याचा दावा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यापुढे नवी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे यांनी पाठवलेली चिन्हं निवडणूक आयोगाच्या १९७ च्या यादीत नसल्याचं विधान संजय शिरसाट यांनी केलं आहे. तर शिंदे गटाकडून पाठवलेली तीन पैकी दोन चिन्हं निवडणूक आयोगाकडे उपलब्ध असल्याचीही शिरसाट यांनी सांगितलं आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’ या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठावल्याप्रकरणी संजय शिरसाट म्हणाले, “उद्धव ठाकरे यांच्या गटाने वेळेच्या आत एफिडेव्हिट सादर करायला हवं होतं. पण त्यांनी तसं केलं नाही. संबंधित एफिडेव्हिट सादर करण्यासाठी निवडणूक आयोगानं त्यांना चार तारखा दिल्या होत्या. तरीही त्यांना वेळेवर एफिडेव्हिट सादर करता आलं नाही. त्यामुळे त्यांना त्यांच्याकडून दिरंगाई झाली, हे मान्य करावं लागेल.”

हेही वाचा- नाव आणि चिन्ह गोठवण्याच्या निर्णयाविरोधात ठाकरे गट उच्च न्यायालयात, अनिल देसाई म्हणाले “अत्यंत घाईत…”

“आता निवडणूक आयोगानं जो निर्णय दिलाय, तो त्यांना मान्य नाही. त्यामुळे ते उच्च न्यायालयात गेले आहेत. इतर कुणीही असतं तरी उच्च न्यायालयात गेलं असतं, हे निर्विवाद आहे. निवडणूक आयोगानं दिलेला निर्णय आमच्यासाठीही दु:खदायक आहे. आम्हालाही ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह पाहिजे होतं आणि त्यांनाही पाहिजे होतं. पण त्यांच्या आणि आमच्या धावपळीत जो विलंब झाला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाचा निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल. आमच्याकडून गदा, तुतारी आणि तलवार हे तीन चिन्हं निवडणूक आयोगाकडे पाठवले आहेत. यातील दोन चिन्ह निवडणूक आयोगाकडे उपलब्ध आहेत. पण ठाकरे गटाकडून पाठवलेली चिन्हं निवडणूक आयोगाच्या १९७ च्या यादीत नाहीत” दावा संजय शिरसाट यांनी केला आहे.

Story img Loader