Sanjay Shirsat On Chandrakant Khaire : शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आज (२८ जानेवारी) एक मोठा गौप्यस्फोट केला. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तळात चर्चांना उधाण आलं. “शिंदेंच्या शिवसेनेकडून खासदारकीची ऑफर आली होती तसेच भारतीय जनता पार्टीकडून राज्यपाल पदाची ऑफर आली होती”, असा गौप्यस्फोट चंद्रकांत खैरे यांनी केला. त्यांच्या या विधानानंतर आता शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते तथा मंत्री संजय शिरसाट याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. लोकसभेच्या निवडणुकीवेळी चंद्रकांत खैरे यांना खासदारकीची ऑफर दिली होती, कारण आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा होता असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संजय शिरसाट काय म्हणाले?

“नक्कीच, तेव्हा लोकसभेची निवडणूक होती आणि चंद्रकांत खैरे त्या अर्थाने जेष्ठ नेते आहेत. माझा पक्ष मला वाढवायचा होता. त्यामुळे माझं काम होतं त्यांना ऑफर देणं. चंद्रकांत खैरे यांनी आज आमच्याकडून लोकसभेची निवडणूक लढवली असती तर ते आज खासदार देखील झाले असते. मात्र, त्यावेळी त्यांनी आमची ऑफर नाकारली, परिणाम असा झाला की त्यांच्याच विरोधात आम्हाला लोकसभेची निवडणूक लढवावी लागली. आमचे संदिपान भुमरे हे लोकसभा लढले आणि निवडून देखील आले”, असं संजय शिरसाट यांनी टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहीनीशी बोलताना म्हटलं आहे.

चंद्रकांत खैरे काय म्हणाले होते?

“मला अनेकवेळा ऑफर आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून मला अनेक मोठमोठ्या नेत्यांकडून ऑफर आल्या. मात्र, मी त्यांना सांगितलं की बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट शिवसैनिक आहे आणि त्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. मी उद्धव ठाकरे यांच्याच नेतृत्वात काम करणार आहे. मला शिंदेंच्या शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीच्या आधी ऑफर होती. कारण त्यांना छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवार मिळत नव्हता. संजय शिरसाट यांनी दोन-तीन लोकांकडे सांगितलं होतं की त्यांना म्हणजे मला घेऊन या आम्ही सर्व खर्च करू वैगेरे, पण मी त्यांना नकार दिला”, असा गौप्यस्फोट चंद्रकांत खैरे यांनी आज केला होता.

भाजपानेही ऑफर दिली होती?

“भारतीय जनता पक्षाकडून मला खूप वेळा ऑफर आली. भाजपाचे काही नेते माझ्याकडे अनेकदा येऊन गेले. यामध्ये महाराष्ट्रातील काही नेते होते. मात्र, माझा संपर्क अनेक वर्षांपासून दिल्लीतील नेत्यांबरोबर देखील आहे. त्यामुळे मला दिल्लीमधूनही ऑफर आली होती. अनेक मान्यवरांनी मला सांगितलं की तुम्ही आमच्याकडे येऊन जा. आम्ही तुम्हाला राज्यसभेची खासदारकी आणि मंत्री करतो. त्यानंतर काही दिवसांपूर्वी हरिभाऊ बागडे राज्यपाल झाले, तेव्हा मलाही सांगितलं की तुम्हाला राज्यपाल करू अशी ऑफर दिली होती. मात्र, मी त्यांना नकार दिला”, असंही चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं होतं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay shirsat on chandrakant khaire mp was offered in shiv sena shinde group chhatrapati sambhaji nagar politics gkt