Sanjay Shirsat On Shivsena : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. यातच ठाकरे गटाचे काही नेते आणि पदाधिकारी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यातच शिवसेना (शिंदे) आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते आरोप-प्रत्यारोप करत असल्यामुळे राजकारण तापलं आहे. मात्र, अशातच शिवसेना (शिंदे) नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी एक मोठं विधान केलं आहे. ‘दोन्ही शिवसेना वेगळ्या झाल्याचं आपल्याला दुःख आहे. पण आपल्याला कधी दोन्ही शिवसेना एकत्र आणण्याची संधी मिळाली तर नक्कीच प्रयत्न करेन’, असं मोठं विधान शिवसेना नेते तथा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळाच मोठी चर्चा रंगली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संजय शिरसाट काय म्हणाले?

आज दोन शिवसेना झाल्या आहेत, याचं कधी दु:ख होतं का? असा प्रश्न संजय शिरसाट यांना विचारला असता ते म्हणाले, “फार दु:ख होतं. तुम्हाला सांगतो की मला आजही हे आवडत नाही. आजही माझ्या मनाला यातना होतात. ठाकरे गटातील नेता किंवा पदाधिकारी भेटतात त्यांचं आणि आमचं नातं तसंच आहे. मात्र, मनामध्ये जे अंतर पडलं आहे, तो त्या पक्षात, मी या पक्षात असं जे झालं आहे हे आवडत नाही”, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. ते एबीपी माझा या वृत्तवाहीनीच्या मुलाखतीत बोलत होते.

“सत्तेत जाण्यासाठी त्यांची (ठाकरेंची) जी काही धडपड सुरु होती, त्याच धडपडीचा परिणाम झाला. यामध्ये कुठेही काँग्रेस नव्हती, राष्ट्रवादी नव्हती. त्यांनी सर्वात जास्त त्रास शिवसेना प्रमुखांना दिला होता. त्यामुळे शिवसेना प्रमुख नेहमी म्हणायचे की काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जायचं नाही. मात्र, जेव्हा सत्तेसाठी जे पाऊल उचललं गेलं तेव्हाच पक्षाचा ऱ्हास होईल असं वाटलं होतं”, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं.

दोन्ही शिवसेना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार का?

दोन्ही शिवसेना किंवा दोन्ही नेत्यांनी एकत्र यावं असं वाटतं का? तसेच जर कधी आपुलकीने बोलायची आणि एकत्र आणण्याची संधी आली तर तुम्ही प्रयत्न करणार का? असं विचारलं असता संजय शिरसाट म्हणाले, “आपुलकीने बोलायची आणि एकत्र आणण्याची संधी आली तर मी प्रयत्न करेन. पण दोघांची तार जुळली पाहिजे. त्या दोघांची तार जुळत असेल तर त्यासाठी माझा काहीही अक्षेप नाही. ज्यांचं कधी तोंड पाहण्याची इच्छा नव्हती त्यांच्या मांडीवर ते जाऊन बसले. माझी चूक तुम्ही माफ करू शकता, तुमची चूक आम्ही माफ केली पाहिजे. एकदा जर त्या तारा जुळल्या तर कोणत्याही गोष्टीला हरकत नाही. मात्र, हे होईल की नाही हा खरा प्रश्न आहे. तसेच प्रयत्न हा एका बाजूने होऊन चालत नाही. आज त्यांची अवस्था काय आहे याचंही भान ठेवलं पाहिजे. एकत्र यायला हरकत नाही. मात्र, त्यासाठी पुढाकार कोण घेईल? हे देवालाच माहिती. जर पुढाकार घेतला आणि विचारांची एक वाक्यता आली तर काहीही गैर राहणार नाही”, असं मोठं विधान संजय शिरसाट यांनी केलं.