Sanjay Shirsat : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर तब्बल एका आठवड्यानंतर आज महायुतीच्या नेत्यांनी राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. खरं तर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरच सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरु झाल्या होत्या. मात्र, सरकार स्थापनेसाठी वेळ लागत होता. अखेर आज भारतीय जनता पक्षाची गटनेतेपदाची बैठक पार पडली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची गटनेते पदी निवड करण्यात आली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. मुख्यमंत्री पदाचा शपथविधीचा कार्यक्रम उद्या मुंबईत पार पडणार आहे. दरम्यान, आता महायुतीच्या सरकारमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला नेमकी किती आणि कोणते खाते मिळणार? तसेच एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद घेणार का? सरकारमध्ये शिवसेनेचं स्थान काय असेल? अशा विविध मुद्यांवर शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी मोठं भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संजय शिरसाट काय म्हणाले?

“आम्ही आमचं मत मांडलं होतं. पण त्यानंतर एकनाथ शिंदेंनी भूमिका जाहीर केली की, सरकार स्थापनेसाठी आमचा कुठेही स्पीड ब्रेकर राहणार नाही. तुम्ही (भाजपा) जो काही निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य राहील असं आम्ही स्पष्ट केलं होतं. आम्हाला वाटत होतं की १३२ आमदार भाजपाकडे आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रिपद ते त्यांच्याकडे देतील असं वाटत होतं. मात्र, आमची इच्छा एवढीच होती की आम्हाला आणखी कालावधी मिळाला असता तर महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकात ताकदीने लढता आल्या असत्या. मात्र, जो निर्णय झाला तो आम्ही मान्य केला. आमची युती ही आणखी मजबुतीने पुढे जाईल, आमच्यात नाराजी वैगेरे काही नाही”, असं संजय शिरसाट यांनी सांगितलं.

हेही वाचा : एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार का? उदय सामंत यांनी दिलं उत्तर; म्हणाले, “त्यांनी…”

सरकारमध्ये शिवसेनेचं स्थान काय असेल?

महायुतीच्या सरकारमध्ये शिवसेनेचं स्थान काय असेल? शिवसेनेला किती आणि कोणते खाते मिळणार? याबाबत प्रश्न विचारण्यात आला असता संजय शिरसाट यांनी म्हटलं की, “उपमुख्यमंत्री पद शिवसेनेकडे असेल. तसेच अनेक खाते जे आहेत, त्या खात्याचं वाटप आज संध्याकाळी होईल. त्यानंतर कोणाला मंत्रिमंडळात घ्यायचं आणि कोणत्या पक्षाला किती मंत्रि‍पदे मिळणार? याबाबत चर्चा होईल. महायुतीमधील तिन्ही नेत्यांनी चर्चा केल्यानंतर कोणाला किती मंत्रि‍पदे मिळतील हे जाहीर केलं जाईल. त्याआधी कोणत्या पक्षाला किती खाते मिळणार? कोणते खाते आपल्याला मिळणार? याची माहिती सांगता येणार नाही”, असं संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलं.

शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार का?

महायुतीच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार का? या प्रश्नावर बोलताना शिरसाट म्हणाले, “आम्ही त्यांना (एकनाथ शिंदे) विनंती केली आहे. तुम्हाला सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद जरी असलं तरी तुम्हाला एक महत्वाची भूमिका घ्यावी लागणार आहे. ते आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांच्या नेतृत्वात आम्ही निवडणुका लढवल्या आहेत. त्यामुळे ते सरकारमध्ये असणं गरजेचं आहे. त्यामुळे ते उपमुख्यमंत्री पद स्वीकारतील अशी आमची इच्छा आहे”, असं संजय शिरसाट यांनी सांगितलं.

फडणवीस-शिंदेंच्या कालच्या भेटीत काय ठरलं?

“देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची काल भेट झाली. या भेटीत फक्त मुख्यमंत्री पदापर्यंत समित चर्चा होती. आज देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड झाली. यानंतर आता खातेवाटप कसे असले पाहिजे? यावर आज चर्चा होईल. त्यानंतरच या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील”, असंही शिरसाट यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay shirsat on how many ministerial posts will shiv sena get in the grand alliance government mahayuti politics gkt