Sanjay Shirsat : महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ ५ डिसेंबर रोजी घेतली. सरकार स्थापन होऊन आठवडा झाला. मात्र, तरीही अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे मंत्रिपदावरून महायुतीत रस्सीखेच सुरु असल्याचं बोललं जात आहे. यावरून आरोप-प्रत्यारोप सुरु असतानाच महाविकास आघाडीला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाविकास आघाडीचे काही खासदार भाजपाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.
तसेच भाजपा महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’ राबवणार असल्याचंही बोललं जात आहे. यासंदर्भात बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील सूचक विधान माध्यमांशी बोलताना केलं. यानंतर आता शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी देखील मोठा दावा केला आहे. अनेकजण शिवसेना (शिंदे) आणि भाजपाच्या संपर्कात असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळाच चर्चांना उधाण आलं आहे.
हेही वाचा : “आमचे सर्व खासदार…”, महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’च्या चर्चांवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया
संजय शिरसाट काय म्हणाले?
“विरोधकांना विधानसभेमध्ये विरोधीपक्ष नेतेपदासाठी विनवण्या कराव्या लागत आहेत. मग त्या पक्षाचे आमदार असतील किंवा खासदार असतील त्यांना याची जाणीव झाली आहे की आता पक्षात राहून पाच वर्ष विरोधाला विरोध करण्यापेक्षा सत्तेमध्ये सहभागी होऊन चांगलं काम मतदारसंघासाठी करु शकलो, तर पुढच्यावेळेला भवितव्य चांगलं राहील. त्यामुळे अनेकजण आमच्याही (शिवसेना शिंदे गट) संपर्कात आहेत आणि भारतीय जनता पक्षाच्याही संपर्कात आहेत”, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. ते टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहीनीशी बोलत होते.
‘ऑपरेशन लोटस’च्या चर्चांवर नाना पटोले काय म्हणाले?
महाविकास आघाडीचे काही खासदार भाजपाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांवर बोलताना नाना पटोले यांनी म्हटलं की, “चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय म्हटलं? हे फार गांभीर्याने घेऊ नका. त्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही. आमचे सर्व खासदार आमच्याबरोबर आहेत. ऑपरेशन लोटसच्या चर्चांवर आता कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. महायुतीच्या सरकारची हालत काय आहे? हे या हिवाळी अधिवेशनात दिसेल”, असं नाना पटोले यांनी म्हटलं.
बावनकुळे नेमकं काय म्हणाले होते?
“महाविकास आघाडीतील काही आमदार, खासदार आम्हाला भेटतात. त्यांचं दुःख मांडत असतात. काँग्रेस नेतृत्व निवडून आलेले आमदार, खासदार यांच्याशी संपर्क करत नाहीत. काँग्रेस नेतृत्वाचं दुर्लक्ष आहे. काही लोक अस्वस्थ आहेत, त्यामुळे पुढे पाहू काय होतं. महाविकास आघाडीला त्यांचे लोक सांभाळता येत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. आम्ही ऑपरेशन लोटस वगैरे राबवत नाही. त्याची गरजच नाही. शिवाय त्यांच्यातले लोक फुटल्यावर ते ईडी सीबीआयच्या नावे खापर फोडतात. आम्ही ईडी आणि सीबीआयकडे कधी गेलो नाही. तपास यंत्रणा त्यांचं काम करत असतात”, असं बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं.