वारंवार स्मरणपत्र देऊनही बंडखोर आमदारांवर कारवाईबाबत अध्यक्ष चालढकल करीत असल्याचा आरोप करीत शिवसेना ठाकरे गटाने पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याच्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांनी शिंदे आणि ठाकरे गटाच्या सर्व आमदारांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. आपल्याला अपात्र का ठरवू नये या नोटिशीला उत्तर देण्यास आमदारांना सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. आमदारांची उत्तरे प्राप्त झाल्यावर प्रत्येकाला वैयक्तिक सुनावणी दिली जाईल. दरम्यान, या नोटिशीवर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिंदे गटातील आमदारांना नोटीस प्राप्त झाल्याने संजय शिरसाटांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “काही लोक सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. ११ मे २०२३ रोजी न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार विधानसभा अध्यक्षांनी नोटीस पाठवली असून हे पत्र प्राप्त झाल्यापासून सात दिवसाच्या आत उत्तर सादर करायचे आहे. उत्तर सादर न केल्यास या अर्जाबाबत आपले काही म्हणणे नाही असं समजून अर्जाबाबत निर्णय घेतला जाईल, अशी नोटीस प्राप्त झाली आहे.”

हेही वाचा >> शिंदे, ठाकरे गटाच्या आमदारांना नोटिसा; अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांकडून प्रक्रिया सुरू

अपात्रतेच्या नोटिशीवर उत्तर देण्याकरता मुतदवाढ मागणार

“या नोटीशीवर आमचे वकील आणि पक्षाचे वकील उत्तर देणार आहेत. परंतु, त्यासाठी काही कालावधी लागू शकतो. त्यामुळे उत्तर देण्याकरता मुतदवाढ आम्ही मागून घेणार आहोत. अध्यक्ष आमच्या विनंतीचा मान ठेवून मुदतवाढ देतील. त्यामुळे वाढवून दिलेल्या तारखेच्या आत आम्ही कायदेशीर उत्तर देऊ”, असं संजय शिरसाट यांनी पुढे स्पष्ट केलं.

“परंतु, ही नोटीस प्राप्त झाली म्हणजे कोणी सर्वोच्च न्यायालयात गेल्याने हे घडलं आहे, असं होत नाही”, असं म्हणत संजय शिरसाटांनी ठाकरे गटावर टोला लगावला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay shirsat on notice of disqualification from maharashtra assembly chairman rahul narvekar sgk
Show comments