राज्यात शिंदे-फडणवीस यांचं सरकार स्थापन झाल्यापासून सतत मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरु असतात. त्यात ‘डबल इंजिन’च्या सरकारला अजित पवार यांचं तिसरं चाक जोडलं आहे. तेव्हापासून रोज मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा होत राहतात. अशातच आता भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्या वक्तव्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
“२०२४ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील,” असं विधान प्रसाद लाड यांनी केलं आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
“२०२४ नाहीतर २०३४ पर्यंत देशात नरेंद्र मोदी यांचं सरकार राहणार आहे. तसेच, २०२४ मध्ये राज्यातही भाजपाचं सरकार येईल आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील,” असं प्रसाद लाड यांनी म्हटलं.
हेही वाचा : शरद पवार अदाणींच्या भेटीसाठी गुजरातमध्ये, राजकीय चर्चांना उधाण; रोहित पवार म्हणाले…
लाड यांच्या विधानावर शिवसेना ( शिंदे गट ) आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “प्रसाद लाड भाजपा विधानपरिषद आमदार आहेत. त्यांच्या नेत्याचं नाव लाड यांनी घेणं गैर नाही. आम्हालाही वाटतं एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील. तर, अजित पवार यांच्या गटाला ते मुख्यमंत्री होतील, असं वाटतं.”
हेही वाचा : कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांचा पत्ता कट होणार? रोहित पवारांचा मोठा दावा; म्हणाले…
“आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, असं कार्यकर्त्याला वाटत असतं. एकनाथ शिंदे ज्या पद्धतीनं आज काम करत आहेत, त्यामुळे पुढील वेळेसही तेच मुख्यमंत्री राहावेत,” अशी इच्छा संजय शिरसाट यांनी व्यक्त केली.