Sanjay Shirsat on Dhananjay Munde : संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) नेते धनंजय मुंडे यांना देखील आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जात होतं. तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. मात्र, गेल्या अडीच महिन्यांत ना मुंडे यांनी स्वतःहून राजीनमा दिला, ना त्यांच्या पक्षप्रमुखांनी, मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा मागितला. दरम्यान, हत्येनंतर ७७ दिवसांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणी सीआयडीने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं. या आरोपपत्रात संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करतानाचे फोटो सादर केले. हे फोटो पाहून राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे. तसेच वाल्मिक कराडला, त्याच्या टोळीतील गुंडांना कठोर शासन व्हावं, वाल्मिक कराडचे निकटवर्तीय धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी होऊ लागली. परिणामी धनंजय मुंडे यांनी आज त्यांचा राजीनामा सादर केला. त्यावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेनेचे (शिंदे) नेते व सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी देखील या राजीनाम्यावर भाष्य केलं आहे.

संजय शिरसाट म्हणाले, “बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामधील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. त्या घटनेचा सर्वांनीच निषेध नोंदवला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या घटनेवर भाष्य करताना सांगितलं होतं की या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई होईल. कोणालाही माफी मिळणार नाही. गुन्हेगारांना कडक शासन होईल. आता या प्रकरणाचा तपास चालू आहे. सीआयडीने याप्रकरणी दोषारोप पत्र दाखल केलं आहे. आता याप्रकरणी सुनावणी होईल. या हत्याप्रकरणात जो कोणी आरोपी निष्पन्न होईल त्याला कठोर शिक्षा होईल. न्यायालय आरोपींना जी शिक्षा देईल ती शिक्षा आपल्याला मान्य करावी लागेल.”

संजय शिरसाट काय म्हणाले?

सामाजिक न्याय मंत्री म्हणाले, “या प्रकरणी धनंजय मुंडे यांचे नाव घेतलं जात होतं. धनंजय मुंडे वाल्मिक कराड याचा आका आहे वगैरे नावं घेतली जात होती. मुंडे देखील आरोपी आहेत, असं चित्र रंगवलं जात होतं. मात्र आता त्यांनी तब्येतीचं कारण दाखवत मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्या प्रकरणावर आता पडदा पडला आहे. तब्येतीचे कारण देऊन राजीनामा दिला असला तरी या प्रकरणात ज्याचा कोणाचा हात असेल त्याला कठोर शिक्षा होईल हे निश्चित. मुंडे यांनी आता राजीनामा दिला आहे. तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारला असून पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे. दुसऱ्या बाजूला संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास चालू आहे. या तपासात काही संशयास्पद आढळलं तर धनंजय मुंडेंवरही कारवाई होईल.

Story img Loader