Sanjay Shirsat On Thackeray group : विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभवाला सामोरं जावं लागलं. महाविकास आघाडीतील प्रमुख तीन पक्षांपैकी एकाही पक्षाला विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याएवढ्या जागाही जिंकता आल्या नाहीत. मात्र, तरीही विधानसभा अध्यक्षांनी ठरवलं तर विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद मिळू शकतं अशी चर्चा आहे. यातच ३ मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणार आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिवसेना ठाकरे गट विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, यावर आता संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया देत मोठं विधान केलं आहे. ‘विरोधकांकडे संख्याबळ नाही. त्यामुळे या अधिवेशनात देखील विरोधी पक्षनेतेपदाचा पेच कायम राहील’, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संजय शिरसाट काय म्हणाले?

शिवसेना ठाकरे गट विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणार असल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत संजय राऊत देखील बोलले आहेत. असा प्रश्न विचारला असता संजय शिरसाट म्हणाले, “त्यांना संख्याबळ कळतं का? विरोधी पक्षनेतेपदासाठी किती संख्या पाहिजे? त्यांच्याकडे संख्याबळ असायला पाहिजे की नाही. महाविकास आघाडीतील कोणत्याच पक्षाकडे संख्याबळ नाही. याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांचा आहे. ते काय निर्णय घेतील हा भाग वेगळा. पण कायदेशीररित्या पाहिलं तर विरोधी पक्षनेता हा विधानसभेत कोणत्याच विरोधी पक्षाचा होऊ शकत नाही ही सध्याची वस्तुस्थिती आहे”, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं.

शिवसेना ठाकरे गटाने दावा विरोधी पक्षनेते पदावर करणार असल्याचं सांगितलं असलं तरी ते ज्या महाविकास आघाडीबरोबर आहेत. त्या महाविकास आघाडीत असलेले दुसरे पक्ष शिवसेना ठाकरे गटाला पाठिंबा देतील असं वाटत नाही. महाविकास आघाडीतील एकही पक्ष म्हणत नाही की तुम्हाला आमचा पाठिंबा आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदाचा पेच या अधिवेशनात कायम राहील”, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं.

फडणवीसांनी आरोग्य विभागातील ३२०० कोटींच्या कामांना स्थगिती दिली?

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्य विभागातील ३२०० कोटींच्या कामांना स्थगिती दिल्याची चर्चा आहे. यासंदर्भात संजय शिरसाट यांना विचारलं असता ते म्हणाले, “आरोग्यमंत्री जरी आमच्या पक्षाचे असले तरी मंत्र्‍यांचं काम फक्त कामांना मान्यता देणं हेच आहे. पण विकास कामे करून घेणं, कामाचं टेंडर काढणं हे ठरवण्याचा अधिकार हा आयुक्तांना असतो. जर त्यात अनियमितता झाली असेल तर किंवा काही चुकीचं झालं असेल तर निश्चित चौकशी केली पाहिजे. तसेच चौकशी केल्यानंतर काही आढळलं तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. आम्ही या मताशी सहमत आहोत. त्यावरून महायुतीत काही बेबनाव आहे असं समजण्याचं काही कारण नाही”, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं.

अंबादास दानवे काय म्हणाले होते?

“शिवसेना ठाकरे गट नक्कीच विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार आहे. याबाबत पक्षाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच सविस्तर भूमिका जाहीर करतील. मात्र, आमच्या झालेल्या बैठकीत शिवसेना ठाकरे गटाने विरोधी पक्षनेते पदासाठी दावा करावा अशी भूमिका पक्षाच्या विधानसभा सदस्यांनी मांडली आहे”, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.