Sanjay Shirsat : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज एका मुलाखतीत बोलताना शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि मनसेने एकत्र येण्याच्या संदर्भात महत्वाचं विधान केलं. मराठी माणसाच्या अस्तित्त्वासाठी आमच्यातील वाद, भांडणं किरकोळ आहेत, एकत्र येणं, एकत्र राहणं यात फार कठीण गोष्ट वाटत नाही. विषय फक्त इच्छेचा आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. दरम्यान, राज ठाकरे यांच्या या विधानानंतर आता उद्धव ठाकरे यांनीही प्रतिक्रिया देत आपणही किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार असल्याचं म्हटलं आहे. मात्र, यासाठी काही अटी उद्धव ठाकरे यांनी ठेवल्या आहेत.
दरम्यान, त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार का? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. यावर आता शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया देत एक मोठा दावा केला आहे. राज ठाकरे यांच्याबरोबर युती करण्यास उद्धव ठाकरे तयार होणार नाहीत, कारण उद्धव ठाकरे यांचा इगो आडवा येईल, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.
संजय शिरसाट काय म्हणाले?
“उद्धव ठाकरे यांना स्वत:च्या पक्षाच्या संघटनेत दुसऱ्यांनी येणं हे उचित वाटत नाही. हा आमचा आतापर्यंतचा अनुभव आहे. महाविकास आघाडीबरोबर काय झालं? युती केली, पण शरद पवार आणि त्यांचं कधी जमलं का? नाही. काँग्रेसचं आणि त्यांचं कधी जमलं का? नाही. आता राज ठाकरे यांच्याबरोबर तर त्यांचं मुळात जमणार नाही”, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.
“राज ठाकरे यांना सर्व गोष्टींची जाणीव आहे, माहिती आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्याबरोबर युती करण्यास उद्धव ठाकरे हे तयार होणार नाहीत. कारण उद्धव ठाकरे यांचा इगो दरवेळी आडवा येतो. त्यामुळे ठाकरे कुटुंब विभक्त झालं. अन्यथा राज ठाकरे यांना कधीही शिवसेना पक्ष सोडवायचा नव्हता किंवा कधीही त्यांनी शिवसेना सोडायची भाषा केली नव्हती. पण तेव्हा उद्धव ठाकरे यांना इगो होता. त्यानंतर राज ठाकरेंना कंटाळून वेगळं व्हाव लागलं”, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर एकत्र येण्यासंदर्भात केलेल्या विधानानंतर आता उद्धव ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांनी एक अट ठेवली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, “किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मीही तयार आहे. सर्व मराठी माणसांच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय. पण माझी अट एक आहे. जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो, महाराष्ट्रातून गुजरातमध्ये कारभार घेऊन जात आहेत, तेव्हाच जर विरोध केला असता तर हे सरकार तिकडे बसलं नसतं. महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार केंद्रात बसवलं असतं. त्याचवेळेला हे काळे कामगार कायदे फेकून दिले असते. पण तेव्हा पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा. मग तडजोड करायची, हे असं चालणार नाही. महाराष्ट्राच्या हिताच्या आड जो कोणी येईल, त्याचं स्वागत मी करणार नाही. त्याला घरी बोलावणार नाही, त्याचं आदरातिथ्य करणार नाही. त्याच्याबरोबर पंगतीला बसणार नाही. हे ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा”, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरे काय म्हणाले होते?
“एकनाथ शिंदेंचं राजकारण वेगळं आणि मी शिवसेनेतून बाहेर पडलो, हे वेगळं आहे. आमदार तेव्हा माझ्याकडेही आले होते. हे मलाही (एकनाथ शिंदेंच्या बंडासारखं) तेव्हा सहज शक्य होतं. पण बाळासाहेब ठाकरे सोडून मी कोणाच्याही हाताखाली काम नाही करणार हा माझा विचार होता. मी बाहेर पडलो त्यावेळेचा हा माझा विचार आहे. पण मी शिवसेनेत होतो तेव्हा उद्धव ठाकरे यांच्याबरोबर काम करायला मला काहीच हरकत नव्हती. पण समोरच्याच्या मनात आहे का? मी त्यांच्याबरोबर काम करावं? महाराष्ट्राची इच्छा असेल तर महाराष्ट्राने जाऊन सांगावं. अशा लहान-मोठ्या गोष्टींत मी माझा इगो आणत नाही”, असं राज ठाकरेंनी एका मुलाखतीत बोलताना म्हटलं होतं.