Sanjay Shirsat On Sujay Vikhe : भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार सुजय विखे यांनी आज एका कार्यक्रमात बोलताना केलेल्या एका विधानावरून आता राजकारण तापलं आहे. शिर्डीतील साई संस्थानच्या प्रसादालयात भक्तांना मोफत भोजन दिलं जातं. मात्र, साई संस्थानच्या प्रसादालयात देण्यात येणारे मोफत जेवण बंद करा आणि जेवणासाठी पैसे घ्या, अशी मागणी सुजय विखे पाटील यांनी केली. एवढंच नाही तर ‘संपूर्ण देश येथे येऊन फुकट जेवण करतो, तसेच संपूर्ण महाराष्टातील भिकारी येथे गोळा झालेत’, असं विधानही सुजय विखे यांनी केलं. त्यांच्या या विधानानंतर विविध स्थरातून प्रतिक्रिया येत आहेत. आता शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. “देशातील भिकारी येथे येऊन जेवतात असं म्हणणं हा साई भक्तांचा अपमान आहे”, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. दरम्यान, सुजय विखे यांच्या या विधानानंतर आता राजकारण तापण्याची शक्यता आहे.
संजय शिरसाट काय म्हणाले?
“शिर्डीत जगभरातील लोक येतात. श्रद्धेपोटी कोट्यवधींची देणगी देखील देतात. मग शिर्डीतील साई संस्थाने जर एखादा चांगला उपक्रम हाती घेतला तर, आता त्या ठिकाणी येणारा भाविक कोण असतो? तेथे येणारे भाविक हे आंध्र प्रदेशमधून दुपारच्या जेवणासाठी येत नाहीत. अन्नदान हे चांगलं काम आहे. देशातील किंवा महाराष्ट्रातील भिकारी येथे येऊन जेवतो आणि जेवण्यासाठी तो तेथे येतो असं म्हणणं हा साई भक्तांचा अपमान आहे”, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.
सुजय विखे काय म्हणाले होते?
“साई मंदिरातील प्रसादालयात आपण मोफत जेवण देतो. मात्र, जेवणासाठी २५ रुपये घेतले पाहिजेत. जेवणासाठी पैसे घेतले पाहिजेत. तो पैसा वाचेल तो पैसा मुला-मुलींच्या शिक्षणासाठी खर्च केला पाहिजे. कारण संपूर्ण देश येथे येऊन फुकट जेवण करतोय. संपूर्ण महाराष्ट्रातील भिकारी या ठिकाणी गोळा झालेत. हे योग्य नाही. संस्थानने आपण काय करत आहोत? याचा विचार केला पाहिजे”, असं माजी खासदार सुजय विखे यांनी म्हटलं होतं.
सुजय विखेंनी आंदोलनाचाही इशारा दिलाय
“संस्थानने २९८ कोटींचं शैक्षणिक संकुल बांधलं. पण आपण दर्जेदार शिक्षण देऊ शकत नाहीत. शिक्षकांच्या पगाराला पैसे जाऊद्या. पण त्यामध्ये शिकणाऱ्या १२ वीच्या विद्यार्थ्याला तरी किमान चांगलं इंग्लिश बोलता आलं पाहिजे. शैक्षणिक संकुलाच्या इमारतीवर खर्च केला जातोय. सभाग्रहावर खर्च केला जातोय, पण गुणवत्तेवर खर्च केला जात नाही. गुणवत्तेवर पैसा खर्च केला पाहिजे, तर विद्यार्थी घडतील. आता इंग्लिश विषय शिकवणाऱ्यालाच इंग्लिश येत नाही. काय उपयोग? इंग्लिशवाला मराठीत इंग्लिश शिकवतोय. त्यामुळे माझी विनंती आहे की आपण साई मंदिराच्या प्रसादालयातील मोफत जेवण बंद करा. मग यासाठी आंदोलनाची वेळ आली तरी आपण आंदोलन करू”, असा इशारा देखील सुजय विखे यांनी दिलाय.