राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार मागील काही दिवसांपासून पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे. अजित पवार यांनी अलीकडेच विरोधी पक्षनेते पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा आणि पक्षाची जबाबदारी द्या, अशा आशयाचं विधान केलं आहे. अजित पवारांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवारांच्या वक्तव्याचे विविध अर्थ काढले जात आहेत. दरम्यान, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित पवारांकडे पक्षाची जबाबदारी दिली जाईल, असं वाटत नाही. प्रत्यक्षात राष्ट्रवादीतील काही नेत्यांचा अजित पवारांना विरोध आहे. अजित पवारांना पक्षाचा प्रमुख करणं, हे काही राष्ट्रवादीतील नेत्यांना परवडणारं नाही, म्हणून त्यांना डावललं जात आहे, असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

हेही वाचा- “त्यांना देशाची नाही, मुलाबाळांची चिंता,” बावनकुळे असे का म्हणाले?

संजय शिरसाट म्हणाले की, “अजित पवार हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत. ते त्यांच्याच पक्षाच्या मेळाव्यात विनवणी करतात की मला विरोधी पक्षनेते पद नको. मला पक्षाची जबाबदारी द्या. हे एका अर्थाने केविलवाणंच झालं. त्यांनी जेव्हा ही मागणी केली तेव्हा सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून दाद दिली. याचा अर्थ राष्ट्रवादीला पुढे घेऊन जायचं काम जर कोणी करेल तर ते अजित पवार करतील, हे कार्यकर्त्यांचंही मत आहे. पण अजित पवारांना पक्षाची जबाबदारी दिली जाईल, असं मला वाटत नाही. आपला पक्ष अजितदादांच्या हातात देणं हे काही जणांना आवडणारं नाही. ते अजित पवारांबाबत आत्मियता आणि आदर दाखवतात पण प्रत्यक्षात (अजित पवारांच्या) विरोधात काम केलं जातं.”

हेही वाचा- “आम्हाला टोमणे मारणारे उद्धव ठाकरे परिवार बचाव बैठकीत…”, देवेंद्र फडणवीसांचा टोला; म्हणाले…

“अजित पवारांना पक्षाचा प्रमुख करणं हे काही राष्ट्रवादीतील नेत्यांना परवडणारं नाही. म्हणून त्यांना डावललं जात आहे. गेल्यावेळी अजित पवारांना मुख्यमंत्रीपद मिळणार होतं. पण स्वतःहून काँग्रेसच्या गळ्यात टाकलं. अजित पवार मुख्यमंत्री झाले असते तर काय झालं असतं? उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं असतं तर काय झालं असतं? कोणतं आभाळ कोसळणार होतं? पण नाही, त्यांची (एकनाथ शिंदे) इमेज वाढली तर आपल्याला धक्का बसेल ही जी ठाकरेंची भूमिका होती तीच भूमिका अजितदादांबद्दल राष्ट्रवादीत आहे. त्यामुळे अजितदादा एक दिवस उठाव करतील असं माझं मत आहे”, असंही संजय शिरसाट म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay shirsat reaction on ajit pawar demand position in party ncp chief sharad pawar rmm
Show comments