लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचे मतदान सोमवारी (दि. १३ मे) रोजी संपन्न झाले. चौथ्या टप्प्याचे मतदान होत असताना अनेक ठिकाणी गडबड झाल्याचे पाहायला मिळाले. पुणे लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी विरोधकांकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप केला तर दक्षिण अहमदनगर मतदारसंघात मविआच्या निलेश लंकेंनी मतदानापूर्वीच बोटांना शाई लावत असल्याचा आरोप केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांच्याकडून आरोप लावण्यात आला होता.
संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर नाशिकमध्ये उतरल्यानंतर त्यातून सुरक्षा रक्षक बॅगा घेऊन जाताना दिसत आहेत. या बॅगांमध्ये पैसे असल्याचा दावा राऊत यांनी केला होता. यावरून शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना उबाठा गटावर टीका केली आहे. तसेच कोणताही माणूस अशा उघडपणे पैशांच्या बॅगा घेऊन जाणार नाही, असे विधान केले आहे.
माध्यमांशी बोलत असताना संजय शिरसाट म्हणाले की, संजय राऊत यांच्या डोक्यावर झालेला परिणाम आपल्याला दिसून येत आहे. कुठल्याही नेत्यासोबत प्रचारासाठी कपड्यांच्या बॅगा असतातच. उद्धव ठाकरे आले होते, त्यावेळी त्यांच्याकडेही बॅगा असतात. राजकीय नेत्यांसोबत येणाऱ्या इतर व्यक्ती, सहकारी, सुरक्षा रक्षक यांच्यादेखील बॅग असतात. परंतु महाविकास आघाडीला आता पराभव दिसत असल्याने चोरून व्हिडिओ काढणे, ते व्हायरल करून त्याच्या बातम्या बनवणे आणि लोकांमध्ये गैरसमज पसरविण्याचे उद्योग सुरू आहेत. आपला पराभव लपविण्यासाठी ते आतापासूनच कारणे शोधून ठेवत आहेत.
पोलिसांत तक्रार का नाही केली?
संजय राऊत यांनी एवढा गंभीर आरोप केला आहे. त्यांच्याकडे व्हिडीओ आहेत, तर त्यांनी पोलिसांत तक्रार का नाही दाखल केली? असाही सवाल संजय शिरसाट यांनी विचारला. परंतु मुख्यमंत्र्यांवर टीका करून एक चित्र निर्माण करण्याच्या प्रयत्न केला जात आहे, असा आरोप संजय शिरसाट यांनी केला.
आम्ही मातोश्रीवर बॅगा पोहोचवल्या
पैशांच्या बॅगा अशा उघडपणे नेल्या जात नाहीत, हे सांगताना संजय शिरसाट यांनी मातोश्रीवर बॅगा पोहोचवल्या असल्याचा दावा केला. ते म्हणाले, पैशांच्या बॅगा अशापद्धतीने नेल्या जात नाहीत. आम्हीदेखील मातोश्रीवर बॅगा पोहोचवल्या पण त्या अशा उघडपणे नाही पोहोचवल्या. मातोश्रीवर बॅगा पोहोचवल्याचे व्हिडीओ तुम्हाला पाहायचे आहेत का? कुठल्या टेम्पोतून किंवा कुठल्या गाडीतून पैसे आले? हे सर्वांना माहीत आहे, याचे उत्तर कसे देणार? असाही प्रश्न संजय शिरसाट यांनी उपस्थित केला.
विरोधकांकडून कधी ईव्हीएम मशीनवर घोटाळ्याचा आरोप केला जात आहे, तर कधी याप्रकारचे व्हिडीओ व्हायरल केले जात आहेत. कोणताही मूर्ख माणूस अशा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? मुर्खांच्या डोक्यावर परिणाम झाला असल्यामुळे ते बडबड करत आहेत, त्यामुळे त्यांना कुणी गांभीर्याने घेत नाही, असाही आरोप संजय शिरसाट यांनी केला.