ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी चारोळी सादर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. ‘दो मस्ताने चले जिंदगी बनाने, चुना लगा के पुरा देश डुबाने’ अशी टीका संजय राऊतांनी केली. राऊतांच्या टीकेला शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं.
“मस्ताने म्हणा किंवा दिवाने म्हणा, पण मुख्यमंत्र्यामध्ये महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचं वेड असावं लागतं. घरात बसण्याचं वेड असू नये,” अशा शब्दांत संजय शिरसाटांनी टोलेबाजी केली. शिंदे-फडणवीस काम करतायत, कामं सुरू आहेत, हीच खरी आमच्या कामाची पावती आहे, असंही शिरसाट म्हणाले. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
संजय राऊतांच्या टीकेबाबत विचारलं असता शिरसाट म्हणाले, “मस्ताने म्हणा किंवा दिवाने म्हणा, पण मुख्यमंत्र्याला महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचं वेड असावं लागतं. घरात बसण्याचं वेड नसावं. लोकांच्या कामाला न येण्याचं वेड नसावं. लोकांच्या सुख-दु:खात सहभागी न होण्याचं वेड नसावं.”
हेही वाचा- “दो मस्ताने चले जिंदगी बनाने, चुना लगाके…”, संजय राऊतांची टोलेबाजी!
“शिवसेनाप्रमुखांना (बाळासाहेब ठाकरे) पेटलेला शिवसैनिक आवडायचा. उठाव करणारा शिवसैनिक आवडायचा. शिवसेनाप्रमुख हे ज्वलंत नेतृत्व होतं. जेव्हा लढायची वेळ येईल, तेव्हा कोणतीही चिंता करू नका, असं ते सांगायचे. पण ते (ठाकरे गट) लढत नाहीत, लाळघोटेपणा करतात. त्यामुळे त्यांनी आम्हाला शिकवण्यापेक्षा मूठभर राहिलेल्या लोकांना सांभाळायचं काम करावं,” असा टोलाही संजय शिरसाट यांनी लगावला.
हेही वाचा- “…म्हणून आम्ही उद्धव ठाकरेंचं दुकान बंद केलं”, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण, म्हणाले…
संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
“मुंबईची कशी लुटालूट सुरू आहे, हे आदित्य ठाकरेंनी सांगितलं. होय, मुंबईची लूटच सुरू आहे. यासाठी दुसरा शब्द नाही. महाराष्ट्रात लूट… मुंबईत लूट… देशात लूट… या लुटीच्या कथा ऐकून मला दोन ओळी सुचल्या. ‘दो मस्ताने चले जिंदगी बनाने, चुना लगा के पुरा देश डुबाने’, हे दोन मस्ताने जसे दिल्लीत आहेत, तसे महाराष्ट्रातही आहेत. ते महाराष्ट्र आणि मुंबईला लुटतायत,” असं राऊत म्हणाले.