ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना बीडचे जिल्हा प्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी कथित मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. आप्पासाहेब जाधव यांनी स्वत: एक व्हिडीओ जारी करत याबाबतचा दावा केला आहे. सुषमा अंधारे स्थानिक पदाधिकाऱ्यांकडे एसी, फर्निचर, सोफा अशा वस्तूंसाठी पैसे मागतात, असा आरोप जाधव यांनी केला. याबाबतचा वाद वाढल्यानंतर आपण सुषमा अंधारे यांना दोन चापट्या लगावल्या आहेत, असा दावाही जाधव यांनी केला. यानंतर आप्पासाहेब जाधव यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
या संपूर्ण प्रकरणावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली. सुषमा अंधारेंवर उपरोधिक टीका करताना शिरसाट म्हणाले, “एवढ्या मोठ्या अॅक्टरला (कलाकाराला) मारहाण झाल्याचं ऐकून दु:ख झालं. त्या एक महान कलाकार आहेत. पैसे घेऊन काम करणाऱ्या नेत्या आहेत. आप्पासाहेब जाधव यांचा व्हिडीओ माझ्याकडेही आला असून तो व्हिडीओ मी पाहिला आहे.
“संबंधित व्हिडीओत त्यांनी आरोप केला की, या बाईने (सुषमा अंधारे) एसी, फर्निचरसाठी पैसे मागितले. एक गोष्ट लक्षात ठेवा, एखाद्या महिलेवर हात उचलण्यापर्यंत मजल जाते, याचा अर्थ आता मर्यादा संपली आहे. त्या बाई असं काहीतरी बोलल्या असतील, ज्यामुळे त्यांनी जे होईल त्या परिणामांना तोंड देईन, या मानसिकतेतून तो व्हिडीओ अपलोड केला,” असं शिरसाट यांनी नमूद केलं.
हेही वाचा- “मी सुषमा अंधारेंना दोन चापट्या लगावल्या”, ठाकरे गटातला वाद चव्हाट्यावर, पाहा VIDEO
“पण त्या बिचाऱ्याला हे माहीत नाही की, या सुषमा अंधारेंनी बाळासाहेब ठाकरेंना म्हातारड्या म्हटलं होतं. त्यांनी उद्धव ठाकरेची वाट लावली. आदित्यला बोकांडी घे आणि ‘लुंगी डान्स’ कर असंही त्या म्हणाल्या होत्या. अशा व्यक्तीला उद्धव ठाकरेंनी मान्य केलं. त्यामुळे तुझ्या निष्ठेचं काहीही मूल्य नाही. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसैनिकांच्या निष्ठेला महत्त्व दिलं होतं. महिलेवर हात उगारू नये, या मताचा मीही आहे. पण महिलेनं मर्यादा ओलांडू नये. मुख्य म्हणजे हा प्रकार जिल्हा प्रमुखांकडून घडला आहे, इतर कुणाकडून घडला असता तर आपण दुर्लक्ष केलं असतं. उद्धव ठाकरेंनी आता तरी डोळे उघडून या गोष्टींकडे पाहिलं पाहिजे. नाहीतर संजय राऊत आणि सुषमा अंधारेंची जोडी त्यांना (उद्धव ठाकरे) बुडवल्याशिवाय राहणार नाही,” असंही शिरसाट म्हणाले.