महाराष्ट्र सरकारमधील भाजपाचे मंत्री विजयकुमार गावित यांनी माशांच्या सेवनाचे फायदे सांगत असताना अजब विधान केलं आहे. मासे खाल्ल्यामुळे डोळे सुंदर होतात. ऐश्वर्या रायही रोज मासे खाते. त्यामुळेच तिचे डोळे सुंदर आहेत. तुम्हीही मासे खा. तुमचेही डोळे सुंदर होतील. मासे खाल्ले तर बाईमाणूस चिकनी दिसायला लागतात, अशा आशयाचं विधान केलं आहे. गावित यांच्या विधानावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गावितांच्या विधानाबाबत विचारताच संजय शिरसाट खळखळून हसले आणि म्हणाले की, विजयकुमार गावित यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने या वयात असं बोललं नाही पाहिजे. काही लोक म्हणतात आंबे खाल्ल्याने पोरं होतात. आता मासे खाल्ल्याने डोळे चांगले होतात, असं गावित म्हणत असतील तर हा संशोधनाचा विषय आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

हेही वाचा- “ऐश्वर्या रायचे डोळे मासे खाल्ल्यामुळे सुंदर झाले”, भाजपाच्या मंत्र्यांचं विधान चर्चेत; म्हणे, “बाईमाणूस चिकनी…”

गावित यांच्या विधानाबाबत विचारलं असता संजय शिरसाट म्हणाले, “गावित यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी या वयात असं बोललं नाही पाहिजे. काही लोक म्हणतात आंबे खाल्ल्याने पोरं होतात. आता मासे खाल्ल्याने डोळे चांगले होतात, असं ते म्हणत असतील तर हा संशोधनाचा विषय आहे. गावित हे स्वत: डॉक्टर आहेत. त्यामुळे त्यांनी असं बोललं नाही पाहिजे. तुम्ही मजा-मस्करीत असं विधान केलं असेल पण समाजात तुम्ही लोकप्रतिनिधी आहात. यावरून तुमचा दृष्टीकोन काय आहे? हे लक्षात येतं. करमणूक म्हणून जरी तुम्ही अशी विधानं करत असला तरी लोक याला गांभीर्याने घेतात. अशी वक्तव्यं तुमच्या तोंडातून येणं, योग्य वाटत नाही.”

हेही वाचा- “आग लगे बस्ती में…”, विजयकुमार गावितांना जितेंद्र आव्हाडांचा टोला; म्हणाले, “पोरी कशा पटवायच्या…”

नेमकं काय म्हणाले विजयकुमार गावित?

उपस्थित श्रोत्यांना माशांच्या सेवनाचे फायदे सांगताना विजयकुमार गावित यांनी थेट अभिनेत्री ऐश्वर्या रायचा उल्लेख केला. “तुम्ही ऐश्वर्या राय बघितली ना? त्यांनी काही सांगितलं की नाही ऐश्वर्या रॉयबद्दल? ती समुद्राच्या किनारी राहणारी. बेंगलोरची समुद्राच्या किनारी राहणारी. ती दररोड मासे खायची. बघितले ना तिचे डोळे? तसे तुमचेही डोळे होणार. हाही एक फायदा आहे”, असं विजयकुमार गावित यावेळी म्हणाले.

“…तर बाईमाणूस चिकनी दिसायला लागतात”

दरम्यान, यावेळी गावित यांनी केलेलं आणखी एक विधानही वादात सापडण्याची शक्यता आहे. “मासे खाल्ले ना, तर दोन फायदे आहेत. मासे खाल्ले तर बाईमाणूस चिकनी दिसायला लागतात”, असं गावित म्हणाले. “डोळेपण तरतरीत दिसतात. कुणीही बघितलं तरी पटवूनच घेणार. आपली त्वचाही चांगली दिसते. त्यात एक प्रकारचं तेल असतं. त्या तेलामुळे डोळ्यांवर परिणाम होतो. माशाच्या तेलामुळे शरीराची त्वचाही चांगली दिसते”, असंही गावित यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay shirsat reaction on vijaykumar gawit statement on aishwarya rai eyes fish food rmm