ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांच्याविरोधात छत्रपती संभाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी संजय शिरसाटांना क्लीनचिट मिळाला असल्याचा दावा करण्यात येतोय. मात्र, हा दावा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी फेटाळून लावला आहे.

नेमकं प्रकरण काय?

छत्रपती संभाजीनगर येथे आमदार संजय शिरसाट यांनी एका कार्यक्रमात सुषमा अंधारे यांच्यावर सडकून टीका केली होती. या टीकेवरून सुषमा अंधारे यांनी परळी पोलीस ठाण्यात शिरसाटांविरोधात तक्रार दाखल केली. परंतु, हे प्रकरण छत्रपती संभाजीनगरमधील असल्याने येथील पोलीस ठाण्यात तक्रार वर्ग करण्यात आली. विनयभंग, बदनामी आणि अब्रू नुकसानीचा दावा सुषमा अंधारे यांनी या तक्रारीतून केला होता. याप्रकरणातून संजय शिरसाटांना क्लीनचिट मिळाली असल्याचे वृत्त समोर येत आहे.

सुषमा अंधारे यांनी केलेल्या तक्रारीवर संजय शिरसाटांना क्लीनचिट मिळाली असल्याचे वृत्त समोर येत आहे. यासंबंधीचे पत्र सुषमा अंधारे यांना चार दिवसांपूर्वीच पाठवण्यात आले आहे. संजय शिरसाटांनी टीका केली तेव्हा सुषमा अंधारे तिथे उपस्थित नव्हत्या. त्यामुळे समोर व्यक्ती नसल्यामुळे विनयभंग होत नाही, असा निष्कर्ष काढून शिरसाटांना क्लिनचीट दिली असल्याचं बोललं जात आहे.

रुपाली चाकणकर काय म्हणाल्या?

रुपाली चाकणकर म्हणाल्या, “सुषमा अंधारेंनी पोलीस तक्रार दिली तेव्हा त्याची नोंद झाली नाही. त्यामुळे त्यांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली. राज्य महिला आयोगाकडे तक्रार आल्यानंतर संबंधित पोलीस विभागाला तपास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. पोलिसांचा अहवाल राज्य महिला आयोगाला प्राप्त झाला. या अहवालात तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, यासंदर्भातील तपास करत असताना कायदेशीर अडचणी येत आहे. या तपासात सरकारी वकिलांची मदत घेऊन त्यांचा अभिप्राय घेऊन तपास करू. इतकंच अहवालातून सांगण्यात आलं आहे. संजय शिरसाटांना क्लीनचिट मिळाल्याचा अहवाल राज्य महिला आयोगाला प्राप्त झालेला नाही”, असंही चाकणकरांनी स्पष्ट केलं. टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.

संजय शिरसाटांची प्रतिक्रिया

“मी वारंवार सांगितले होते की, मी काहीही चुकीचे वक्तव्य केलेले नव्हते. एखाद्याला बदनाम करण्याचा हा प्रकार आहे. आता तरी त्यांनी समजावे”, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाटांनी दिली आहे.

Story img Loader