२०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि भाजपा-शिंदे गटाने कंबर कसली आहे. यासाठी दोन्हींकडून आढावा बैठका आणि दौरे सुरु आहेत. अशातच शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार विनायक राऊत यांनी शिंदे गटाबाबत मोठा दावा केला आहे. “२२ आमदार शिंदे गट सोडण्याच्या तयारीत असून, ९ खासदारही आमच्या संपर्कात आहेत,” असं विनायक राऊतांनी सांगितलं. यावर संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
विनायक राऊत काय म्हणाले?
“शिंदे गटातील २२ आमदार वैतागले आहेत. हे आमदार बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. १३ पैकी ९ खासदारही आमच्या संपर्कात आहेत. खासदारही वैतागले आहेत. कामे होत नसून तुच्छतेची वागणूक मिळत आहे. इतर कोणालाही किंमत मिळत नाही, अशी तक्रार आमदार आणि खासदारांची आहे,” असं विनायक राऊतानी म्हटलं होतं.
“त्यांच्याकडं जाऊन मला अपात्र व्हायचं आहे का?”
यावर संजय शिरसाट यांनी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधताना प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “खोट बोलायचं, पण रेटून बोलायचं काम केलं जातंय. त्यांच्याकडं चिन्ह, पक्ष आणि सत्ता नाही, मग लोक त्यांच्याकडं कशाला जातील. अपात्र होणारे आमच्या संपर्कात आहेत. त्यांच्याकडं जाऊन मला अपात्र व्हायचं आहे का? पण, आमदारांना थांबवण्यासाठी वावड्या उठवल्या जात आहेत,” असं संजय शिरसाटांनी सांगितलं.
हेही वाचा : सुषमा अंधारे विनयभंग प्रकरणात पोलिसांची क्लीनचिट? संजय शिरसाट स्पष्टीकरण देत म्हणाले…
“अंगावर कोट आणि हातात मेकअपचा डब्बा तो…”
“ठाकरे गटाचे प्रमुख संजय राऊत आहेत. यांच्या कृती सर्वसामान्य शिवसैनिकाला आवडत नाहीत. कधी नव्हे ते ‘मातोश्री’ शरद पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’ बंगल्यावर जाते. हे चित्र शिवसैनिकांनी कधीच पाहिलं नाही. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, ‘ज्याचं पोट पाठिला चिटकलेलं आहे, तोच शिवसैनिक…’ आता चित्र उलटं झालं आहे. ज्यांच्या अंगावर कोट आणि हातात मेकअपचा डब्बा तो शिवसैनिक,” असा टोला संजय शिरसाटांनी राऊत आणि सुषमा अंधारेंना अप्रत्यपणे लगावला आहे.