दसरा मेळाव्याच्या निमित्तानं शिवसेनेकडून ( शिंदे गट ) मुंबईत बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लावण्यात आला आहे. यावरून शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.
“बाटगा मोठ्यानं बांग देतो. नपुसंक कांदा जास्त खातो. तशीच बॅनरबाजी करण्यात आली आहे. बॅनरवरील चेहरा पोटात कळ आल्यासारखा आहे. बाळासाहेबांबरोबर फोटो लावण्याची आमची किंवा उद्धव ठाकरेंची हिंमत झाली नाही. आम्ही बाळासाहेबांच्या पक्षाचे मालक नाही, तर विश्वस्त आहोत. ही डुप्लिकेट लोक असून हा डुप्लिकेट मेळावा आहे,” असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला होता. याला आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
“बाळासाहेबांबरोबर फोटो लावण्यासाठी लायकी पाहिजे. शिवसैनिक कधीही बाळासाहेबांच्या फोटोशिवाय जगू शकत नाही. म्हणून पहिल्यांदा लायकी निर्माण करा,” असं टीकास्र शिरसाटांनी राऊतांवर डागलं आहे.
“संजय राऊतांना फोटो कुणी पाहायला सांगितलं आहे. शिवसेनाप्रमुखांचे विचार डोक्यात घ्यावे. ‘शिवसैनिक माझे कवचकुंडल आहेत’ असं शिवसेनाप्रमुख सांगायचे. बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळे आम्ही आहोत, हे राऊतांना माहिती नाही,” असेही शिरसाटांनी सांगितलं.
हेही वाचा : “शिवसेना तोडली, राष्ट्रवादी पक्षही फोडला अन् मिंध्या-लाचार…”, ठाकरे गटाचा भाजपावर हल्लाबोल
“हे सर्व बाटगे शिवाजी पार्कवर दिसतील. संजय राऊतांना कांदा खाल्ल्याशिवाय पर्याय नाही,” असा हल्लाबोलही शिरसाटांनी केला आहे.