बिग बॉस ओटीटी २ विजेता एल्विश यादवविरोधात नोएडामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर क्लब आणि पार्ट्यांमध्ये विषारी सापांची तस्करी केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. गणेशोत्सवात एल्विश यादव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी पुजेसाठी आला होता. त्यावरून विरोधकांकडून सरकारवर टीका केली जात आहे. याप्रकरणावरून शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत.
“एल्विश यादव मुख्यमंत्र्यांच्या घरी जातो. त्याला त्यांच्या गटातील एक खासदार घेऊन जातो. तो खासदार स्वत: ड्रग्जचं सेवन करतो. या व्यक्तीला वर्षा बंगल्यावर कुणी आमंत्रित केलं होतं? मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी त्याचा काय संबंध आहे?” असे सवाल संजय राऊतांनी उपस्थित केले आहेत.
“मुख्यमंत्र्यांचं राजकीय कुटुंब ड्रग्ज व्यवहारात सहभागी आहे का? दिल्लीत मुख्यमंत्र्यांच्या राजकीय कुटुंबातले किती आमदार ड्रग्जचे सेवन करतात, याची माहिती हवी असेल, तर मी देईन,” असं मोठं विधान संजय राऊतांनी केलं होतं. याला आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा : “ड्रग्ज घेणाऱ्या आमदारांची माहिती माझ्याकडे आहे”, संजय राऊतांचा खळबळजनक दावा!
“एल्विश यादवने सांगितलं की, ‘०.१ टक्केही यात माझा सहभाग असेल तर शिक्षा भोगण्यास तयार आहे.’ पण, हे स्वत: नशेडी लोक आहेत. फक्त बेछूटपणे आरोप करतात. आम्हाला संजय राऊतांचे आरोप गंभीर वाटत नाहीत. यांची पूर्वीची दुकानदारी याच गोष्टीवर चालू होती. ड्रग माफियांना मोडीत काढण्याचं काम सरकार करत आहे,” असं संजय शिरसाटांनी सांगितलं.