शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीबाबत बुधवारी (१२ एप्रिल) मोठा दावा केला आहे. बंडखोरी होण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’ बंगल्यावर आले होते. मातोश्रीवर येऊन एकनाथ शिंदे रडले होते, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आदित्य ठाकरे यांच्या या दाव्यावर आता वेगवेगळ्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय शिरसाट म्हणाले की, आम्ही आमदारांनीच एकनाथ शिंदे यांना मातोश्रीवर जाण्यास सांगितलं होतं. आमचं म्हणणं मांडण्यासाठी ते तिथे गेले होते. परंतु मला वाटतं आदित्य ठाकरे यांनी ‘रडले’ हे शब्द चुकीचे वापरले आहेत.
संजय शिरसाट म्हणाले, मला वाटतं आदित्य साहेबांनी जो दावा केला आहे की, शिंदे साहेब मातोश्रीवर यायचे आणि रडायचे, त्यापैकी ‘रडायचे’ हे शब्द त्यांनी चुकीचे वापरले आहेत. कारण आम्ही सर्वच आमदार वारंवार उद्धव साहेबांना भेटायचो. आम्ही त्यांना सांगितलं होतं की, आम्हाला या आघाडीत राहायचं नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवाले आम्हाला त्रास देतात, सहकार्य करत नाहीत. निधीबाबत सहकार्य करत नाहीत. ही आमची भूमिका आम्ही उद्धवजींकडे मांडली होती.
हे ही वाचा >> “…तेव्हा कोणाचे पाय पकडले?” नितेश राणेंचा ठाकरे पिता-पुत्रांना सवाल, म्हणाले, “लवकरच गौप्यस्फोट…”
शिरसाट म्हणाले की, आम्ही सर्व आमदार एकनाथ शिंदे यांच्याशी देखील बोललो. शिंदेंना म्हणालो, तुम्ही आमचे गटनेते आहात, आम्ही कोणाकडे जायचं. त्यानंतर निश्चितच एकनाथ शिंदे साहेब मातोश्रीवर गेले असतील. परंतु आपण आघाडीतून बाहेर पडावं हे सांगण्यासाठी. सर्व आमदारांची तशीच इ्छा होती. आम्ही सर्वांनीच एकनाथ शिंदेंना तसं सांगितलं होतं. त्यानंतर शिंदे साहेबांनी देखील तेच सांगितलं. बाकी रडले वगैरे बोलायची ही त्यांची (आदित्य) स्टाईल असावी.