विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते अजित पवार भारतीय जनता पार्टीत जाणार असल्याच्या चर्चांना आज स्वतः अजित पवारांनीच पूर्णविराम दिला आहे. अजित पवार आज माध्यमांसमोर येऊन म्हणाले की, “कारण नसताना माझ्याबद्दल आणि माझ्या काही सहकाऱ्यांबद्दल गैरसमज निर्माण करण्याचं काम जाणीपूर्वक केलं जात आहे. वास्तविक ज्या बातम्या दाखवल्या जात आहेत, यामध्ये काहीही तथ्य नाही.
दरम्यान, अफवा पसरवणाऱ्या नेत्यांचाही अजित पवारांनी समाचार घेतला. यामध्ये पवारांचा रोख हा भाजपा आणि शिवसेनेच्या शिंदे गटातील नेत्यांवर होता. याबद्दल शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट म्हणाले की, आम्ही वक्तव्य करताना शांत डोक्याने केलं होतं. केवळ जर-तरची भाषा वापरली. आम्ही म्हणालो की, अजित पवार आले तर आम्ही स्वागत करू. त्यांना राष्ट्रवादी नसेल सोडायची तर तो त्यांचा प्रश्न आहे.
हे ही वाचा >> “अजित पवार घेतील तो निर्णय मान्य, पण…”, भाजपाप्रवेशाच्या चर्चेवर अमोल मिटकरीचं सूचक वक्तव्य
शिरसाट म्हणाले की, त्यांचं (शिवसेना – ठाकरे गट) मुखपत्र असलेल्या ‘सामना’चा रोख त्यांच्या (पवारांच्या) घरातल्या भांडणावर होता. त्यामुळे अजित दादांनी संजय राऊतवर चिड व्यक्त केली. संजय राऊतला त्यांनी तडकवलं आहे. अजित पवारांबद्दल बोलायचा अधिकार संजय राऊतला कोणी दिला. संजय राऊत ठरवणार का? अजित दादांनी काय केलं पाहिजे काय करू नये. म्हणूनच अजित दादांनी आज सडकून उत्तर दिलंय, यानंतर ते (राऊत) ध्यानावर येतील, असं मला वाटतं.