ज्येष्ठ भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ‘लोकसत्ता’ आयोजित ‘लोकसंवाद’ कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. अजित पवार यांच्याबरोबर पहाटेचा शपथविधी हा उद्धव ठाकरे यांना धडा शिकविण्यासाठी आपद्धर्म होता आणि तो शाश्वत धर्म नसतो, असे परखड मत त्यांनी मांडलं. मुनगंटीवारांच्या या वक्तव्यावर आता राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. सुधीर मुनगंटीवारांना त्यांच्या पक्षात कोणी विचारत नाही असं शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले. यावर आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय शिरसाट यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे. शिरसाट म्हणाले, पहाटेचा शपथविधी उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी झाला होता हे बरोबर आहे, त्यात चुकीचं काहीच नाही. मुळात तुम्ही (शिवसेना) भाजपासोबत युत्तीत निवडणूक लढता. प्रचारावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावून लोकांची मतं मागता. प्रत्येक मतदारसंघात भाजपा आणि शिवसेनेच्या मतांवर तुम्ही निवडणूक लढलात आणि जिंकलात. परंतु निवडणुकीच्या निकालानंतर तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाता.
शिरसाट म्हणाले, यांना (उद्धव ठाकरे) सत्तेची लालसा वाटली. त्यामुळे यांनी दुसरीकडे जायचा निर्धार केला तेव्हा भाजपाने केलेली ही खेळी योग्यच होती.
हे ही वाचा >> “मोफत तिकिट दिलं नाही, तर नाटक कसं होतं बघतो”, पोलिसांच्या धमकीनंतर VIDEO ट्वीट करत खासदार अमोल कोल्हे म्हणाले…
काय म्हणाले होते मुनगंटीवार?
भाजपशी युती करून निवडून आल्यावर उद्धव ठाकरे ज्या प्रकारे वागले, त्यांना धडा शिकविण्यासाठी अजित पवार यांचे समर्थन आम्ही घेतले आणि पहाटेचा शपथविधी झाला. मी १६ मार्च १९९५ रोजी निवडून आलो होतो. त्या वेळी आम्ही शिवसेना नेत्यांबरोबर एकवीरा देवीच्या दर्शनाला गेलो होतो. तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला काँग्रेसबरोबर जाणार नाही किंवा मदत करणार नाही, अशी शपथ दिली होती. पण उद्धव ठाकरे त्याच काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून सरकारमध्ये बसले. राजकारणात काही वेळा परिस्थितीनुसार तात्कालिक स्वरूपात आपद्धर्म म्हणून काही निर्णय घ्यावे लागतात.