महाराष्ट्रात शिवसेनेचा शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार येऊन आज जवळपास एक वर्ष होत आलं तरी अद्याप या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. परंतु लवकरच शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी चर्चा आहे. पुढच्या आठवड्यात किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार होईल असं बोललं जात आहे. विशेष म्हणजे नव्या कॅबिनेट मंत्र्यांच्या नावांची यादीदेखील तयार असल्याची चर्चा आहे.
शिवसेनेच्या शिंदे गटातील प्रमुख नेते आणि आमदार संजय शिरसाट यांना नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याची चर्चा आहे. याबाबत टीव्ही ९ मराठीने संजय शिरसाट यांच्याशी बातचित केली. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शिरसाट यांना विचारलेल्या अनेक प्रश्नांवर शिरसाट यांनी उत्तरं दिली.
यावेळी संजय शिरसाट यांना विचारण्यात आलं की, बरेच आमदार नाराज असल्याचं बोललं जात आहे. त्यावर तुम्ही काय सांगाल. यावर संजय शिरसाट म्हणाले, नाराजी असणारच, कधीही मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना प्रत्येकाला स्थान मिळत नाही. जसं गेल्या मंत्रिमंडळात मला स्थान मिळालं नाही, तेव्हा मी नाराज होतो. पण अशा नाराज्या असतातच. सगळ्यांनाच मंत्री करता येत नाही. सगळेजण मुख्यमंत्री होत नाही किंवा सगळेच जण उपमुख्यमंत्री होत नाहीत.
हे ही वाचा >> “ना कोचिंग, ना लाखोंचा खर्च”, यूपीएससीत देशात दुसरी आलेल्या गरिमाने सांगितला यशाचा मंत्र
शिरसाट यांना प्रश्न विचारण्यात आला की, मंत्रीपद मिळालं नाही तर नाराज आमदार मातोश्रीकडे (उद्धव ठाकरे गट) परत जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे, त्याबद्दल काय सांगाल. या प्रश्नावर शिरसाट म्हणाले, मातोश्रीवर काय आहे? तिथे उरलंय काय? उलट तिकडे जे १५ आमदार आहेत ते शिंदे साहेब त्यांना बोलावण्याची वाट बघत आहेत. सगळेजण शिंदे साहेबांबरोबर आहे. मंत्रीपद मिळो न मिळो आम्ही सर्वजण शिंदे साहेबांसोबत काम करणार आहोत.