सांगली लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत काँग्रेस आणि शिवसेनेच्या ठाकरे गटात रस्सीखेच चालू होती. या जागेबाबत अद्याप निर्णय झालेला नाही असं तिन्ही पक्षांचे नेते सातत्याने सांगत होते. अशातच शिवसेनेच्या ठाकरे गटाने दोन दिवसांपूर्वी त्यांच्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये १७ उमेदवारांची नावं असून यात सांगलीच्या जागेचाही समावेश आहे. ठाकरे गटाने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना सांगलीतून लोकसभेची उमेदवारी दिली आहे. परंतु, या उमेदवारीला काँग्रेसने विरोध केला आहे. काँग्रेस नेते विशाल पाटील हे सांगलीतून लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत होते. त्यास पलूस-कडेगावचे आमदार विश्वजीत कदम यांच्यासह स्थानिक काँग्रेस नेत्यांचा पाठिंबादेखील आहे. परंतु, ठाकरे गटाने या जागेवरून त्यांचा उमेदवार जाहीर केला असल्याने महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाला आहे.
सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत तिढा निर्माण झाला आहे. यावरून शिवसेनेच्या शिंदे गटाने महाविकास आघाडीवर टीका केली आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते आणि आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगलीच्या जागेवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षात भांडण लावलं आहे. ही शरद पवारांची खेळी असून ठाकरे गट त्या खेळीत अडकला आहे.
संजय शिरसाट म्हणाले, ज्या सांगलीत शिवसेना उबाठा पक्षाचं अस्तित्व नाही, जी जागा ते कधी लढले नाहीत त्या जागेवर उबाठा गट आणि काँग्रेसमध्ये तिढा कसा काय निर्माण होईल. मुळात हा तिढा निर्माण व्हावा म्हणून ही ठरवून केलेली खेळी आहे. उबाठा गटाचं सांगलीवर कसलंही प्रेम नाही. ज्याला त्यांनी सांगलीतून उमेदवारी दिली आहे तो डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील काही उबाठा गटाचा कार्यकर्ता नाही. ज्याच्यासाठी उबाठा गट आग्रही भूमिका मांडतोय तो चंद्रहार पाटील शिवसैनिकही नाही. खरंतर ही शरद पवारांनी खेळलेली खेळी आहे. त्या खेळीत उबाठा गट फसला आहे. उबाठा गट आणि काँग्रेसनं भांडायचं आणि शरद पवार दुरून मजा बघणार.
सांगली लोकसभेसाठी विश्वजीत कदमांनी ठोकला शड्डू
पलूस-कडेगावचे आमदार आणि सांगलीतले स्थानिक नेते विश्वजीत कदम तसेच विशाल पाटील यांनी आज (२७ मार्च) दिल्लीत वरिष्ठ काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांची भेट घेतली. या भेटीत कदम आणि पाटील यांनी सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी प्रयत्न करावेत अशी गळ घातली. या भेटीनंतर विश्वजीत कदम म्हणाले, मी यापूर्वी अनेकदा स्पष्ट केलं आहे की, कोल्हापूर लोकसभेच्या बदल्यात सांगलीची लोकसभा दिली जाईल असं कधीच ठरलं नव्हतं. कारण ते आम्हाला मान्य नाही. छत्रपती शाहू महाराज (दुसरे) ज्या पक्षातून कोल्हापूरची लोकसभा लढवतील त्या पक्षातून त्यांना तिकीट दिलं जाईल असं महाविकास आघाडीत ठरलं होतं. त्यानंतर शाहू महाराजांनी स्वतःहून काँग्रेस पक्ष निवडला. शिवसेनेची (ठाकरे गट) इच्छा असल्यास त्यांनी हातकणंगलेची जागा लढावी. त्यांनी राजू शेट्टी यांना त्यांच्या पक्षात घ्यावं आणि ती जागा लढवावी.