महाराष्ट्रात २०१९ च्या विधानसभा निवडणुकांनंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने एकत्र येत सत्ता स्थापन केली. परंतु अडीच वर्षांनी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी केली. शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांना बरोबर घेऊन वेगळा गट स्थापन केला. भाजपाच्या पाठिंब्यावर त्यांनी सत्तास्थापन केली. या घटनेला एक वर्ष उलटलं तरी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही. शिंदे गट असो वा भाजपा आमदार सर्वांना मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा आहे. हा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होईल असं बोललं जात आहे.
शिवसेना फुटल्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाने शिंदे गटाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. हे प्रकरण जवळपास १० महिन्यांहून अधिक काळ सुप्रीम कोर्टात होतं. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपाने मंत्रिमंडळाचा विस्तार केला नव्हता असं सांगितलं जातं. परंतु आता सुप्रीम कोर्टाने जुनं सरकार पुन्हा बसवता येणार नाही असं सांगितलं आहे. तसेच आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा विधानसभेच्या अध्यक्षांकडे सोपवला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराची वाट आता मोकळी झाली आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय शिरसाट यांना नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याची चर्चा आहे. याबाबत टीव्ही ९ मराठीने संजय शिरसाट यांच्याशी बातचित केली. यावेळी संजय शिरसाट म्हणाले. मला बातम्या पाहून असं वाटतं होतं की, मंत्रिमंडळातलं माझं स्थान लटकलेल्या अवस्थेत आहे.
हे ही वाचा >> “ना कोचिंग, ना लाखोंचा खर्च”, यूपीएससीत देशात दुसरी आलेल्या गरिमाने सांगितला यशाचा मंत्र
शिरसाट यांना प्रश्न विचारण्यात आला की, ज्या आमदारांना मंत्रीपद मिळणार नाही ते मातोश्रीकडे (ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान) परत जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे, त्याबद्दल काय सांगाल. या प्रश्नावर शिरसाट म्हणाले, मातोश्रीवर काय आहे? तिथे उरलंय काय? उलट तिकडे जे १५ आमदार आहेत ते शिंदे साहेब त्यांना बोलावण्याची वाट बघत आहेत. शिंदे साहेबांनी बोलावलं तर ते कधीही वर्षा बंगल्यावर दिसतील. पण शिंदे साहेब म्हणतात आधी आमचं आम्हाला बघुद्या, त्यांना कशाला उगाच बोकांडी बसवून घ्यायचं.