कॅगच्या अहवालात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विभागावर ठपका ठेवल्यानंतर विरोधी पक्षांनी भ्रष्टाचाराचे आरोप करत मोदी सरकारवर हल्लाबोल केला. दरम्यान, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी हा दिल्लीतील राजकारण्यांनी नितीन गडकरींना संपवण्याचा केलेला कट असल्याचा आरोप केला आहे. तसेच राऊत यांनी गडकरींना मोठी ऑफर दिली आहे. राऊत म्हणाले, “महाराष्ट्राचं एक नेतृत्व देशभर लोकप्रिय होत आहे. उद्या ते पंतप्रधानपदाचे दावेदार होतील म्हणून दिल्लीतल्या नतद्रष्ट राजकारण्यांनी नितीन गडकरींना संपवण्याचा कट केला आहे. महाराष्ट्र हा कट उधळून लावण्याचं काम करेल. गडकरींनी त्यांना घाबरण्याचं कारण नाही त्यांनी फक्त एक आवाज द्यावा. ‘इंडिया’ आघाडीत यावं, आम्ही गडकरींना पंतप्रधान केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा शब्द उद्धव ठाकरेही देतील.
विनायक राऊत यांच्या या वक्तव्यावर आता वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रवक्ते आणि आमदार संजय शिरसाट यांनी राऊतांच्या या ऑफरवरून त्यांना टोला लगावला आहे. आमदार शिरसाट म्हणाले, कोण आहेत हे खासदार विनायक राऊत? अरे माणसाने लायकी पाहून बोलावं. यांचे स्वतःचे खासदार निवडून येतील की नाही हे माहीत नाही आणि हे पंतप्रधानपदाची ऑफर देतायत. तुम्ही काय राष्ट्रीय नेते आहात का? तुम्ही कोणाबद्दल बोलत आहात याचं तरी भान राखा.
आमदार संजय शिरसाट म्हणाले, मी जर आता उठून अमेरिकेच्या अध्यक्षांबद्दल, देशाच्या पंतप्रधानांबद्दल बोलायला लागलो तर लोक ते स्वीकारतील का? मुर्खासारखं वक्तव्य का करायचं? यांची स्वतः निवडून यायची खात्री कमी आणि देशाचे पंतप्रधान बनवायला चालले आहेत. अशा वक्तव्यांवर लोक हसतात. विनायक राऊत यांच्या डोक्यावर संजय राऊत यांचा परिणाम झालेला दिसतोय. म्हणून त्यांनी स्वतःची काळजी घ्यायला हवी आणि अशी वक्तव्ये बंद करावी.