लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुती यांचे जागावाटप रखडले आहे. मविआमध्ये प्रकाश आंबडेकर यांना किती आणि कोणत्या जागा सोडायच्या यावरून मतभेद आहेत. तर महायुतीमध्ये भाजपाला अधिक जागा लढवायच्या असल्यामुळे शिंदे आणि अजित पवार गटाला किती जागा सोडाव्यात यावर खल सुरू आहे. त्यातच शिंदे गटाच्या पाच विद्यमान खासदारांचे तिकीट कापले जाणार असल्याचे बोलले जात आहे. यावरून भाजपा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोंडी करत आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विद्यमान भावना गवळी, सदाशिव लोखंडे, गजानन किर्तीकर आणि इतर दोन खासदारांचे तिकीट कापले जाणार असल्याची चर्चा आहे. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भाजपाकडून कोंडी होत असल्याचा प्रयत्न होत आहे का? असा प्रश्न संजय शिरसाट यांना विचारण्यात आला होता. यावर ते म्हणाले, भाजपाचा आमच्यावर कोणताही दबाव नाही. तसेच दबाव टाकण्याचा कोणताही प्रश्न उद्भवत नाही. लोकसभेचे उमेदवार ठरवत असताना त्या मतदारसंघातील जनमताची चाचणी करून उमेदवार ठरवले जात आहेत. तसेच उमेदवार ठरविण्याचा अंतिम अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. एकनाथ शिंदे कोणाच्या दबावतंत्राला बळी पडतील, असे आम्हाला वाटत नाही. येत्या मंगळवारी ते शिवसेनेचे उमेदवार जाहीर करतील, असे आम्हाला वाटते.

मनोज जरांगेंचा लोकसभा निवणडणुकीआधी मोठा निर्णय, म्हणाले, “मराठा व्होट बँक…”

माझी सर्व भाकितं खरी ठरली

माध्यमांशी बोलत असताना संजय शिरसाट म्हणाले की, मी आजवर जी जी भाकितं केली ती सर्व खरी ठरली आहे. अजित पवार, अशोक चव्हाण, रवींद्र वायकर यांच्याबाबत जे जे बोललो, ते झालेले आहे. म्हणून मला वाटतं कदाचित मला भविष्य वर्तविण्याचा छंद लागला की काय. पुढील काही दिवसात छत्रपती संभाजीनगरच नाही तर महाराष्ट्रातील अनेक नेते शिंदे गट, भाजपामध्ये सहभागी होणार आहे, असे नवे भाकित संजय शिरसाट यांनी केले. महायुतीच्या तीनही पक्षात मंगळवारी अनेक नेते प्रवेश करणार असल्याचे ते म्हणाले.

बारामती लोकसभेबाबत विजय शिवतारेंची मोठी घोषणा, म्हणाले, “१२ तारखेला १२ वाजता…”

पुतणे लोक आजकाल जास्त बोलतायत

शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांचे पुतणे संग्रामसिंह पाटील यांनी पुण्यात शरद पवारांची भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात सामील होण्याचा विचार व्यक्त केला आहे. तसेच शहाजीबापू पाटील यांनीही शरद पवार गटात सामील व्हावे, असे आवाहन केले आहे. या प्रश्नावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, महाराष्ट्रातील पुतणे आता जास्त बोलायला लागले आहेत. परंतु शहाजीबापूंचा राजकारणातला अनुभव अतिशय दांडगा आहे. ते अभ्यास करूनच राजकीय निर्णय घेत असतात. त्यामुळे त्यांच्या पुतण्याने त्यांना ऑफर देण्याची काही गरज नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay shirsat spoke about bjp bjps upper hand over on shiv sena shinde faction rno news kvg