नाशिक लोकसभा मतदारसंघात शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे. मात्र, या जागेवरून भाजपा, शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. तिन्ही पक्षांकडून नाशिकच्या जागेवर दावा सांगितला गेल्याने तिढा निर्माण झाला. दरम्यान, यासंदर्भात शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनाही प्रतिक्रिया दिली आहे. आज किंवा उद्या दुपारपर्यंत नाशिकच्या जागेसाठी उमेदवाराची घोषणा होईल, असे ते म्हणाले. त्यामुळे राजकीय वर्तुळातही विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले संजय शिरसाट?

शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना, नाशिकच्या जागेसाठी आमच्यावर कोणताही दबाव नाही. नाशिकची जागा शिवसेनेची आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही हे स्पष्ट केलं आहे. आज किंवा उद्या दुपारपर्यंत नाशिकच्या जागेसाठी उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा – नाशिकच्या जागेचे भवितव्य ठाण्यावर अवलंबून, तिढा कायम

नाशिकच्या जागेचा तिढा कायम :

मागील काही दिवसांपासून नाशिकच्या जागेवरून महायुतीतील तिन्ही पक्षात रस्सीखेच सुरू आहे. स्थानिक पातळीवरील संख्याबळ दाखवत भाजपाकडून नाशिकच्या जागेवर दावा करण्यात आला आहे. अलीकडेच उमेदवारीच्या स्पर्धेतून छगन भुजबळ यांनी माघार घेतली असली तरी राष्ट्रवादी अजित पवार गटाने नाशिकवरील दावा सोडलेला नाही. याशिवाय या जागेवर शिवसेनेच्या शिंदे गटानेही दावा केला आहे.

महत्त्वाचे म्हणजे बीड येथे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पंकजा मुंडे यांनी खासदार प्रीतम मुंडे यांचे पुनर्वसन करण्यात येईल. त्यांना नाशिकमधून उमेदवारी देऊ, असे विधान केले होते. त्याच्या प्रतिक्रिया राजकीय क्षेत्रात उमटल्या होत्या. यावरून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या विधानाचा समाचार घेतला होता. पंकजाताई मुंडे यांनी आपल्या स्वतःच्या निवडणुकीतच लक्ष घालावे. त्यांचे निवडून येणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यांनी बीडमध्येच लक्ष घातलेलं चांगलं राहील, असे ते म्हणाले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay shirsat statement on nashik candidate name for loksabha election claimed bjp ajit pawar group spb
Show comments