राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी ‘लोक माझे सांगती’ या पुस्तकाच्या सुधारीत आवृत्ती प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी अचानक आपल्या निवृत्तीची घोषणा केली. शरद पवारांच्या या घोषणेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचा नवीन अध्यक्ष कोण होईल, याबाबतची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहेत. दरम्यान, यासंदर्भात आता शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनीही भाष्य केलं आहे. एबीपी माझा वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा – VIDEO: “शरद पवारांचा राजीनामा हा मास्टर स्ट्रोक, कारण…”, मनसेचे आमदार राजू पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले…
काय म्हणाले संजय शिरसाट?
शरद पवारांनी निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. आज ते वयाच्या ८२व्या वर्षीही आम्हाला लाजवेल असं काम करतात. रोजच्या वृत्तपत्रात शरद पवारांचं नाव नाही, असं कधीही होत नाही. मात्र त्यांच्या वयाचा विचार केला तर त्यांनीही कुठंतरी थांबलं पाहिजे. त्यामुळे त्यांनी वयामुळे हा निर्णय घेतला असेल तर एकवेळ ठीक आहे. मात्र, राष्ट्रवादीतील अंतर्गत कलहातून त्यांनी हा निर्णय घेतला असेल तर हे दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली.
दरम्यान, शरद पवारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार होतील की सुप्रिया सुळे याबाबत विचारलं असता, आज राष्ट्रवादी काँग्रेसची परिस्थिती आणि वाटचाल बघता अध्यक्षपदासाठी शरद पवारांसमोर अजित पवारांशिवाय दुसरं कोणतंही नाव असेल असं वाटत नाही, असे ते म्हणाले.
हेही वाचा – राजकीय चातुर्यात उद्धव ठाकरे कमी पडले! ‘लोक माझे सांगाती’ पुस्तकात शरद पवार यांचे निरीक्षण
शरद पवारांचं कार्यकर्त्यांवरचं प्रेम सर्वांनाच माहिती आहे. आजही त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांची नावं माहिती आहेत. त्याचप्रमाणे आज कामाच्याबाबतीत विचार केला, तर अजित पवारांचं नाव पुढं येतं. सकाळी ८ वाजता येऊन मंत्रालायत बसणे असो किंवा कार्यक्रमांना वेळेवर हजेरी लावणे असो, कामाच्याबाबतीत त्यांचा हात कोणीही पकडू शकत नाही. त्यामुळे उद्या जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा विषय आलाच तर निश्चित अजित पवार हे अध्यक्ष झाले पाहिजे, अशी कार्यकर्त्यांची भावना असेल, असंही त्यांनी नमूद केलं.