केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्यानंतर आता शिंदे गट शिवसेना भवनावरही दावा करणार का? याबाबत विविध राजकीय चर्चा सुरू आहेत. दरम्यान, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी यााबाबत एक मोठं विधान केलं आहे. शिवसेना भवनावर आम्ही कधीही दावा सांगणार नाही, असं ते म्हणाले. एबीपी माझा या वृत्तावाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले संजय शिरसाट?
“शिवसेना भवन ही केवळ इमारत नाही, तर आमच्यासाठी मंदिर आहे. त्यामुळे आम्ही शिवसेना भवनावर कधीही दावा करणार नाही. ठाकरे गटाच्या नेत्याच्या मनातले विचार अत्यंत चुकीचे आहे. मात्र, एक गोष्ट निश्चित आहे. जेव्हा-जेव्हाही आम्ही शिवसेना भवनाजवळून जाऊ, तेव्हा तेव्हा शिवसेना भवनसमोर आम्ही नतमस्तक होऊ. आमच्या अनेक आठवणी शिवसेना भवनाशी जुळलेल्या आहेत. बाळासाहेबांबरोबर अनेक बैठका आमच्या त्या ठिकाणी झाल्या आहेत. त्यामुळे आम्ही त्यावर कधीही दावा सांगणार नाही”, असं स्पष्टीकरण संजय शिरसाट यांनी दिलं.
“शिवसेनेच्या शाखा शिंदे गटाच्या ताब्यात जाणार नाहीत”
तत्पूर्वी सकाळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनाही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली होती. “निवडणूक आयोगाने शेण खाल्लं म्हणून शिवसेना भवन आणि आमच्या शाखा शिंदे गटाच्या ताब्यात जाणार नाहीत. आमचे शिवसैनिक तिथेच बसतील आणि ती जागा शिवसेनेची शाखा म्हणूनच काम करेल. शिवसेना पक्ष आमचाच आहे. खुर्चीवर बसलेल्या काही लोकांनी निर्णय घेतला म्हणून पक्ष कुठेही जात नाही. शिवसेना भवनासह शिवसेनेची शाखा, शिवसेनेची संपत्ती आणि हजारो लाखो शिवसैनिक आमच्या बरोबरच राहतील”, असे संजय राऊत म्हणाले होते.